पावसाची पाठ ; दुबार पेरणीचे सावट
By Admin | Updated: July 2, 2014 23:11 IST2014-07-02T23:11:59+5:302014-07-02T23:11:59+5:30
भंडारा जिल्ह्यात धान शेती मुख्य व्यवसाय आहे. बारमाही वाहणाऱ्या वैनगंगेचे पात्र जिल्ह्यातून गेले असले तरी नदीच्या पाण्याने पऱ्हे वाचविता येऊ शकत नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे

पावसाची पाठ ; दुबार पेरणीचे सावट
पऱ्हे करपले, शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात, कृषी विभागाचा अहवालच तयार नाही
भंडारा : भंडारा जिल्ह्यात धान शेती मुख्य व्यवसाय आहे. बारमाही वाहणाऱ्या वैनगंगेचे पात्र जिल्ह्यातून गेले असले तरी नदीच्या पाण्याने पऱ्हे वाचविता येऊ शकत नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील शेतीचे अर्थकारणच धोक्यात आले आहे. मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने टाकलेले पऱ्हे करपू लागले आहेत. महागडे बियाणे उपयोगात न आल्याने बळीराजा संकटात सापडला असून यंदा खरीपाचे पीक होणार की नाही या विवंचनेत शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
शेतकरी थकला
शहापूर : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्ह स्पष्ट पणे दिसून लागली आहेत. भात शेती सोबत सोयाबिन पिकाच्याही पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस लांबल्यामुळे जलस्त्रोत आटल्याने कृषी पंपावर आधारित शेती सुद्धा कोरडीच आहे. भारनियमनाची झळ सुद्धा शेतीला बसत आहे. पावसाअभावी शेती कोरडीच असून शेतकरी संकटात सापडला आहे. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसानंतर एक दोन दिवस पऱ्हे टाकण्यास सुरूवात झाली होती. मात्र त्यानंतर पेरणी प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.
पाणीटंचाई
पावसाळा सुरू होऊनही पावसाला सुरूवात न झाल्यामुळे ग्रामीण भागासोबत शहरी भागात सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोके वर काढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये २१ टक्के जलसाठा असला तरी लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा उपलब्ध ठरला आहे. शेतीसोबत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण उभी ठाकली असून विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. ग्रामीण भत्तगातील बहुतांश बोअरवेलला असलेले दूषित पाणी, पाणी पुरवठा योजनेत भारनियमनामुळे असलेली अनियमितता यामुळे ग्रामीण जनता पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाली असून पिण्याच्या पाण्याकरिता झुंबड उडताना दिसत आहे.
चाऱ्याचा प्रश्न
पावसाअभावी शेतातील धुऱ्यावर व चराई क्षेत्रात गवत अजून उगवलेच नाही. पशुपालक शेतकऱ्याकडे जेमतेम चारा शिल्लक आहे. पाऊस असाच दडी मारून बसला तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक बिकट होणार आहे. एकीकडे पावसाचा पत्ता नाही तर दुसरीकडे पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. गाव शिवारातील नाले, तलाव, विहिरी आटल्या आहेत. विहीरीतील पाणी २०-२० फूटपर्यंत खोल गेले आहे. यामुळे शेतातील पंप कृषी सुद्धा निरूपयोगी ठरत आहेत.
शेतमजूर बेरोजगार
पावसाने दडी मारल्याने पेरणी तर खोळंबलेलीच आहे पण शेतात काम नसल्याने ग्रामीण भागातील शेतमजूराच्या हाताला कामही उरले नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणाच घसरला आहे. दहावी बारावीचे निकाल लागून पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. उच्च माध्यमिक माध्यमिक पर्यंतच्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली आहे. मात्र हाताला कामच नसल्याने पाल्याच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतमजूरासमोर निर्माण झाला आहे.
महागाईची झळ
पाऊस लांबल्याने त्याच्या परिणाम भाजीपाला उत्पादनावर होवून भाज्यांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली असून अशीच परिस्थिती राहिली तर भाज्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या दिवसात सणाची सुरूवात होणार असून भाज्यांची मागणी वाढणार आहे. आधिच दुष्काळाच्या दृष्टचक्रात होरपळलेला सामान्य नागरिकांची महागाईमुळे दमछाक होणार आहे.
हुलकावणी
मोहदुरा :पावसाळा सुरु झाला आणि बळीराजा जोमाने शेतीच्या कामाला लागला. बियाणे घेतले पेरणी केली. खताचा पुरेसा साठा जमा करून ठेवला. या हंगामात तरी चांगले पीक होईल, अशी अपेक्षा असताना पावसाने हुलकावणी दिली आहे. मोहदुरा परिसरातील मोहदुरा, हत्तीडोई, गुंजेपार, खुर्शीपार, टवेपार व सातोना या ठिकाणी भाताची लागवड केली जात असून ही निसर्गाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. परंतु पावसाळा सुरु होऊन महिना लोटूनही पाऊस बरसला नाही. अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत ते शेतकरी आभाळाकडे टक लावून पाहत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी पुरता होरपळला आहे.
अंकुर सुकले
जांब : १५ दिवसांपूर्वी वरुणराजाने कृपादृष्टी दाखविल्याने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली. धानाचे पऱ्हे टाकण्यात आले. परंतु पाऊस न बरसल्याने पेरलेली बियाणे व्यर्थ जाण्याच्या मार्गावर आहेत. लोहारा, जांब, ताडगाव, धोप, सोरणा, गायमुख, लेंडेझरी, पिटेसूर, रोंघा, कांद्री, हिवरा, धुसाळा, आंधळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्यामुळे शेतामध्ये पेरलेले बियाणेचे अंकुर सुकत आहे.
पावसा पाव!
खराशी : पहिला पाऊस पडला आणि बळीराजा शेतीच्या कामाला लागला. निसर्गाच्या लहरीपणाची पुनरावृत्ती यंदा तरी होणार नाही, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाने पाठ फिरविली असून शेतकरी ईश्वराला विणवणी करीत असून देवा यंदा तरी पावशील का, असा प्रश्न विचारत आहेत. दरवर्षी रासायनिक खते आणि औषधे यांचीही किंमत भरमसाठ वाढत आहे. त्यामानाने धानाला मिळणारा भाव अत्यल्प आहे. धानाची पेरणी झाल्यानंतर रोवणी, निंदणी, कापणी, मळणी आणि अधूनमधून खतांची आवश्यकता या कामांसाठी मजुरांची गरज असते. मात्र एकीकडे धानाचे भाव घटताना दुसरीकडे मजुरांचे आणि खतांचे भाव गगनाला भिडत आहोत.
(लोकमत न्युज नेटवर्क)