पाऊस रुसला; शेकडो हेक्टरवरील रोवणी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:41+5:30
गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील साधारणत: २५ टक्के क्षेत्रात धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी १ लाख ८३ हजार हेक्टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात १३ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी तयार करण्यात आली होती. परंतु आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहेत.

पाऊस रुसला; शेकडो हेक्टरवरील रोवणी ठप्प
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन रोवणीच्या दिवसात पाऊस रुसल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. नर्सरीतील पऱ्हे सुकायला लागली असून प्रत्येक दिवस कोरडा उगवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी शेतकरी आक्रमक होत आहे. पावसाने अशीच विश्रांती घेतली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानपिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला की धान रोवणीला सुरुवात होते. धानपिकासाठी प्रथम नर्सरी तयार करावी लागते. त्यालाही पाण्याची आवश्यकता असते. तसेच जोरदार पाऊस झाल्यानंतर रोवणीला प्रारंभ होतो. साधारणत: जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून रोवणी केली जाते. परंतु यंदा पावसाने सुरुवातीला शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखविले. त्यानंतर पाऊस मात्र बेपत्ता झाला. कधीमधी पाऊस बरसत असला तरी हा पाऊस धानपिकासाठी पोषक नाही.
गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील साधारणत: २५ टक्के क्षेत्रात धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी १ लाख ८३ हजार हेक्टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात १३ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी तयार करण्यात आली होती. परंतु आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहेत. परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. त्यातच प्रचंड ऊनही तापत आहे. त्यामुळे रोवणी झालेले पऱ्हे माना टाकत आहेत. अशीच स्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ४४६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते १७ जुलै या कालावधीत ४३७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. तसे पाहता सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला आहे. परंतु हा पाऊस काही सलग झाला नाही. आठवड्यातून एक-दोन दिवस जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर उन्ह तापत असल्याने अनेक ठिकाणी नर्सरीच्या जमिनीला तडे जात आहेत. डोळ्यादेखत पीक वाळत आहे तर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी वारंवार करीत आहे. परंतु अद्यापही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले नाही.
एकंदरीत दरवर्षी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही संकटाला सामोरे जावे लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. दररोज कडक उन्ह तापत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. कधी पाऊस पडतो याची प्रतीक्षा आहे.
हवामान खात्याचा अंदाज चुकला
- पालांदूर : मे महिन्यात हवामान खात्याने अंदाज वर्तविला तेव्हा चांगला पाऊस कोसळणार असे सांगितले होते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून दमदार पावसाचे आगमनही झाले. त्यानंतर मात्र पाऊस विश्रांती घेऊ लागला. सर्वदूर अपेक्षित पाऊस कोसळत नसल्याने आता शेतकरी हवामान खात्यावर टीका करताना ग्रामीण भागात दिसत आहेत.
- जुलै महिन्यातील १७ दिवसात अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही. नदी-नाल्यांना प्रवाह मिळाला. परंतु पावसाला नियमित जोर दिसत नाही. अपेक्षित पाऊस पडत नसल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. आधीच कोरोनाचे सावट त्यात पाऊस बेपत्ता यामुळे सर्व शेतकरी चिंतेत आहेत.