रेल्वे उड्डाण पुलाचे काम कासवगतीने
By Admin | Updated: May 19, 2015 01:01 IST2015-05-19T01:01:16+5:302015-05-19T01:01:16+5:30
तुमसर-गोंदिया या राज्य मार्गावर मुंबई-हावडा रेल्वे मार्ग फाटकावर रेल्वे उड्डाण पुलाचे काम निधीअभावी

रेल्वे उड्डाण पुलाचे काम कासवगतीने
चार टप्प्यांत मिळणार निधी : बायपास रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरु
तुमसर : तुमसर-गोंदिया या राज्य मार्गावर मुंबई-हावडा रेल्वे मार्ग फाटकावर रेल्वे उड्डाण पुलाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. तीन महिन्यांपासून केवळ बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. याच गतीने कामे सुरु राहिली तर किमान चार वर्षे उडाणपुलाच्या पूर्णत्वास लागतील. राजकीय श्रेय घेण्याकरिता मात्र लोकप्रतिनिधी प्रयत्नशील दिसत आहेत.
मागील १३ वर्षापासून उड्डाण पुलाचे काम रखडून पडले होते. रेल्वे मंत्रालय व राज्य शासनाने रेल्वे उडाणपुल तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देत आहे. केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे तर रेल्वे विभागाकडून १८ कोटींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उडाणपूलाचे भूमिपूजन केले होते. निवडणुकीनंतर येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
मागील तीन महिन्यांपासून केवळ बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. कासवगतीने सदर काम केले जात असल्याने अशीच गती असली तर किमान उडणपुल पूर्णत्वास तीन ते चार वर्षे निश्चितच लागतील. प्रचंड वातूकीची कोंडी येथे दररोज होते. अपघाताला आमंत्रण देणारा हा प्रमुखराज्य मार्ग ठरला आहे.
केंद्रात व राज्यात सत्ता बदल झाले. त्याचा परिणाम या उडाणपुल बांधकामावर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहेत. याचा निधी देण्यावरही परिणाम होत असल्याचे समजते.
पहिल्या टप्प्याचा निधी प्राप्त झालेला आहे. पुढील टप्प्याचा निधीची येथे प्रतिक्षा असल्याचे समजते. येथे श्रेय लाटण्याचा प्रकार सुरु असल्याचे समजते. सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे.
उड्डाण पुलाकरिता प्रत्येक कामाचा टप्प्यानुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. श्रेयाचे राजकारण सोडून उडाणपूल पूर्णत्वाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची प्राथमिक गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)