On the radar of sand smugglers | रेती तस्कर जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर
रेती तस्कर जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर

ठळक मुद्देजिल्हास्तरीय समिती स्थापन : पोलीस व महसूल यंत्रणा करणार संयुक्त कारवाई, महसूल अधिकाऱ्यांना निर्देश


मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्ह्यातील घाटातून होणाऱ्या नियमबाह्य रेती उपस्याची जिल्हाधिकाºयानी गंभीर दखल घेतली असून जिल्हास्तरीय समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. रेती तस्करांविरूद्ध धडक मोहीम राबविली जाणार असून महसूल आणि पोलिस संयुक्त कारवाई करणार आहे. रेतीघाटातून रेतीचोरी प्रकरणी स्थानिक महसूल प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. पवनी येथील रेती प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे रेतीतस्करांसोबत महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
भंडारा जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या रेतीचा विदर्भासोबतच लगतच्या मध्यप्रदेशात मोठी मागणी आहे. वैनगंगा, बावनथडी, सुरनद्यांच्या पात्रातील रेतीची भुरळ अनेकांना पडली आहे. तात्काळ पैसा प्राप्त होत असल्याने अनेकजण या व्यवसायात शिरले आहे. राजकीय वरदहस्तातून अनेकजण गब्बर झाले आहे. आर्थिक संपन्नतेमुळे तस्करीत वाढ झाली असून शेकडोजण या व्यवसायात गुंतले आहे. राजाश्रयाने कुणावरही कारवाई होत नाही.
रेती तस्कराविरूद्ध महसूल प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात तर रेतीतस्कारांचे मोठे रॅकेट गत अनेक वर्षापासून सक्रीय आहे. महसूल लविभागाचे नियम कडक असतानाही या नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. उपविभागीय अधिकारी तहसीलदारांनाही रेती चोरी थांबविण्यात यश आले नाही. उलट रेती तस्कारांची हिम्मत वाढून पोलिसांवर हल्ला करण्याइतपत झाली आहे.
जिल्ह्यातील रेती चोरीप्रकरणाची दखल जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी घेतली आहे. उपजिल्हाधिकारी व इतर अधिकाºयांची दक्षता व नियंत्रण समिती स्थापन केली आहे. प्रत्येक तालुक्यात रेती चोरी प्रकरणी स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. चोरी रोखण्यात असर्थ ठरल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
रेती चोरी रोखण्यासाठी विशेष भरारी पथक नेमण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अवैध रेती वाहतूक करणाºया ट्रकवर आतापर्यंत केवळ पोलिसांनी कारवाई केली. याचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून आता महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकाºयांच्या रडारवर आहेत. पोलीस, खनिकर्म आणि महसूल विभाग संयुक्त कारवाई करणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दोन दिवसापुर्वी एक बैठक घेतली. त्यात रेती उत्खनन, रेती वाहतूक, रेतीघाटांची सविस्तर माहिती जाणून घेतली. उलाढालीचा आकडाही जाणून घेतला. या रेती तस्करीला कोण जबाबदार आहे याचीही माहिती त्यांनी घेतली. कारवाई थंडबस्त्यात का जाते, याचीही त्यांनी माहिती घेतली आहे. यापुढे रेती तस्करी व तस्करांच्या मुसक्या आवळण्याची खंबीर भूमीका जिल्हाधिकाºयांनी घेतली आहे.

खासदारांनी केली वरिष्ठांकडे तक्रार
रेती चोरी प्रकरणी खासदार सुनील मेंढे यांनीही गंभीर दखल घेतली आहे. मुंबई मंत्रालय व दिल्ली येथेही रेती चोरीप्रकरणाची त्यांनी तक्रार केली आहे. आगामी काळात रेतीचोरीवर अंकुश येण्याची शक्यता बळावली आहे. भंडारा जिल्ह्यात रेतीतस्करी मोठ्या प्रमाणात होत असून आता जिल्हाधिकाºयांपाठोपाठ खासदारांनीही लक्ष घातल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: On the radar of sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.