बाबासाहेबांचा पिंड राष्ट्रभक्तांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:45 IST2016-04-14T00:45:37+5:302016-04-14T00:45:37+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आजही दलितांचे नेते, मागासवगीर्यांचा उध्दारक अशीच केली जाते.

बाबासाहेबांचा पिंड राष्ट्रभक्तांचा
जिल्हास्तरीय कार्यशाळा : भाऊ लोखंडे यांचे प्रतिपादन
भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आजही दलितांचे नेते, मागासवगीर्यांचा उध्दारक अशीच केली जाते. एखाद्या वेळी त्यांना घटना समितीचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. परंतु डॉ. आंबेडकर यांचा पिंड राष्ट्रभक्तांचा आहे. त्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या पाली प्राकृत विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांनी केले. भंडारा येथे आयोजित जिल्हास्तरीय पत्रकारांच्या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त संजिव गाढे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे, गोपू पिंपळापूरे, चेतन भैरम आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलित करुन करण्यात आले. लोखंडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना सांगितले की, त्यांनी इग्लंड येथे गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी सांगितले होते की, देशाच्या स्वातंत्र्याच्या मुद्यावर कधीही समझोता करणार नाही.
देशाचे तुकडे होण्याचा अंदाज घेऊन कायदेमंत्री असतांना त्यांनी तात्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना हैद्राबादच्या निजामावर सैन्याची कारवाई टाळून पोलीस कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. मुंबई प्रांतातील सरकार पक्षात असतांना त्यांनी जंगल सत्याग्रह करणाऱ््या देशभक्तांची न्यायालायात बाजू मांडली व त्यातील सर्वांना निर्दोष मुक्त केले होते.
चीन या समाजवादी राष्ट्राकडून देशावर आक्रमण होण्याची चिंता त्यांनी नेहरु शासनाकडे व्यक्त केले होती. या सर्व घटनांचे लिखित पुरावे आहेत. डॉ. आंबेडकर यांनी त्या काळात आर्थिक बाजूची मयार्दा सांभाळत सहा वृत्तपत्रांतून समाज जागृती केली होते. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक , महिलांचे अधिकार, जातीभेद अशा अनेक प्रश्नांवर लेख, बातम्या प्रकाशित केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात देशाचे स्वातंत्र्याबाबत सर्वसामान्यांप्रमाणे समाज जागृती केली होती. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यात परावर्तीत केले नाही तर, राजकीय स्वातंत्र पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केली होती.
धमार्चा वापर जोडण्यासाठी व्हावा, तोडण्यासाठी नव्हे, ही त्यांची अपेक्षा होती. देश गुलाम नव्हता, पण काही लोकांच्या गद्दारीमुळे पारतंत्र्यात गेला. आता मिळलेले स्वातंत्र्याचा चांगला उपयोग केला नाही तर, पुन्हा गुलाम होण्यास वेळ लागणार नाही अशी चिंता त्यांनी व्यक्त केल्याचेही लोखंडे यांनी सांगितले.
संजीव गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणारे समाजसुधारक, तत्वज्ञानी यांच्याबाबत माहिती दिली.महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज अशा अनेकांचा प्रभाव डॉ. आंबेडकर यांच्यावर होता. जॉन ब्रित मानवतावादी दृष्टीकोण, विल्यम गॅरीसन यांच्याकडून अस्पृश्यतेविरोधी लढा, एडमंड बर्क, अब्राहम लिंकन, व्हॉल्टेअर आदी विचारवंतांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
बंधूभावाची निर्मिती केल्याशिवाय राष्ट्रवादाची निर्मिती होणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
अध्यक्षीय भाषणातून राजेंद्र निंबाळकर यांनी देशात समता, बंधुता, न्याय यावर आधारित लोकशाही राज्यव्यवस्था स्थापन करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. समाजातील सर्व घटकांना संघटीत करण्यावर त्यांनी भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या जयंती तसेच २४ एप्रिलला पंचायत राज दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
देवसूदन धारगावे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सामाजिक न्याय विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमांची माहिती दिली. संचालन गणवीर यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी मानले. (प्रतिनिधी)