ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या माध्यमातून आधारभूत खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाचे २५८ काेटी १७ लाख चार हजार ५१ रुपयांचे चुकारे थकीत आहे. जिल्ह्यातील ४३ हजार ३८५ शेतकऱ्यांनी १८ लाख ३९ हजार ७२२ क्विंटल धानाची विक्री केली. आता खरीप हंगाम आटाेपत येत असतानाही अद्याप चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी माेठ्या संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकरी सावकाराच्या दारात उभे आहेत.जिल्ह्यात खरीप आणि रबी या दाेन हंगामात धानाचे पीक घेतले जाते. गत खरीप हंगामात एक लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची पणन महासंघाला विक्री केली हाेती. त्याची किंमत ७०० काेटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये हाेती. त्यापैकी ७०० काेटी ७१ लाख ६१ हजार ६०४ रुपयांचे चुकारे करण्यात आले. खरीप हंगामातील दाेन लाख ४८ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहे. यासाेबतच बाेनसची निम्मी रक्कमही अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही, असे असतानाही शेतकऱ्यांनी रबी हंगामातील धान पणन महासंघाला विकला.जिल्ह्यातील ४३ हजार ३५८ शेतकऱ्यांनी १८ लाख ३९ हजार ७२२ क्विंटल धान आधारभूत किंमत १८६८ रुपयांनी विकला. या धानाची किंमत ३४३ काेटी ६६ लाख एक हजार ४६१ रुपये आहे. आतापर्यंत केवळ ८५ काेटी ४८ लाख ९७ हजार ४१० रुपयांचे चुकारे करण्यात आले. मात्र आता दाेन महिने झाले तरी २५८ काेटी १७ लाख चार हजार ५१ रुपयांचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. शेतकऱ्यांनी उधार उसणवार करीत खरीप हंगामात राेवणी केली. आज ना उद्या पैसे मिळतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राेवणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी माेठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने शेतकरी सावकाराच्या दारात उभे आहेत.
वित्त विभागाकडे पाठपुरावा- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकाेलीचे आमदार नाना पटाेले यांनी राज्याच्या वित्त विभागाकडे यासंबंधी पाठपुरावा केला आहे. राज्य शासनाच्या वतीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात साेमवारपासून जमा हाेईल, असे सांगण्यात आले. पंधरा दिवसात सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येईल, असेही ते म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी सांगितले.
शेतकरी आता आंदाेलनाच्या पवित्र्यातअद्यापही धानाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये असंताेष खदखदत आहे. पणन महासंघाकडे विचारणा केली जात आहे. परंतु अद्यापही पैसे मिळाले नाहीत. येत्या आठ दिवसात पैसे मिळाले नाही तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.