निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बीची लागवड घटणार
By Admin | Updated: November 29, 2014 23:14 IST2014-11-29T23:14:54+5:302014-11-29T23:14:54+5:30
खरीप हंगामात पावसाचा अनियमितता व कमी पावसामुळे धानाच्या पेरणीला उशिर झाला. याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. पेरणीच्या हंगामाला उशिर झाल्याने ६० टक्के शेतजमिनीवर

निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बीची लागवड घटणार
बळीराजावर आर्थिक संकट : ६० टक्के शेतीवर पेरणीची शक्यता
भंडारा : खरीप हंगामात पावसाचा अनियमितता व कमी पावसामुळे धानाच्या पेरणीला उशिर झाला. याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. पेरणीच्या हंगामाला उशिर झाल्याने ६० टक्के शेतजमिनीवर रब्बीची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे ४० टक्के शेतजमीन पडीक राहण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
धानासाठी प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी खरीप हंगामात बसला. पावसाळ्यात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले. पावसाच्या लहरीपणामुळे धान पऱ्हे करपल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर ओलीताच्या भरवशावर काहींनी पेरणी ओटपल्या. मात्र पेरणीनंतर पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या तर काहींनी शेती पडीत ठेवण्यापेक्षा उशिरा पेरण्या आटोपल्या. यामुळे खरीपाच्या हंगामाच्या अखेरपर्यंत पेरण्या सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघायला मिळाले.
खरीपाच्या शेतीतील धान कापणी रब्बी पिकाचा हंगाम सुरू होऊनही सुरूच आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीची पेरणी अजुनपर्यंत आटोपली नसल्याने तिला फार विलंब होत आहे. साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीची पेरणी पूर्ण व्हायला पाहिजे. नोंव्हेंबर अखेरपर्यंत कापणीच सुरू असल्याने जिल्ह्यात रब्बीची पेरणी सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ४६ टक्क्यांवरच पोहचली आहे.
कमी व अनियमित पावसामुळे सध्या जमीनीत ओलावा राहिला नाही. त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्याकडे ओलीताचे साधन आहे. ते शेतकरी पेरणी आटोपण्यावर भर देत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहु मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यानंतर हरभरा, ज्वारी व गळीतधान्याचे पिक घेतल्या जाते.
रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने ४५ हजार ११५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणीसाठी निर्धारित केले होते. त्यापैकी २० हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. तृणधान्यासाठी ११ हजार ३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणी करण्याचे उद्दीष्ट होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ २ हजार ४५२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी पार पडली आहे. हरभरा, लाख, पोपट, वाटाणा, उडीद या धान्यांसाठी ३० हजार २३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले होते. केवळ १४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. जवस, सुर्यफुल, करडई, मोहरी, तीळ, एरंडी व अन्य गळीत धान्यासाठी ३ हजार ७५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले होते. त्यापैकी २ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.
मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पेरणी निर्धारित केलेल्या क्षेत्रात पूर्णपणे आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उशिरा धान पेरणीमुळे उतारीतही घट आली आहे. शासनाने धानाची आधारभुत किंमत जाहीर केली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. (शहर प्रतिनिधी)