Public curfew every Saturday-Sunday in the district | जिल्ह्यात दर शनिवार- रविवारी जनता कर्फ्यू

जिल्ह्यात दर शनिवार- रविवारी जनता कर्फ्यू

ठळक मुद्देसर्वपक्षीय बैठकीत निर्णय : कोरोना साखळी तोडण्यासाठी केली जाणार कडक उपाययोजना, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात यायचे नाव घेत नसल्याने आता दर शनिवार - रविवारला जनता कर्फ्यूचे आयोजन करण्याचा निर्णय सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय सभेत घेण्यात आला. या जनता कर्फ्यूची सर्वत्र कडक अंमलबजावणी करण्याचेही ठरविण्यात आले असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ आॅक्टोंबर रोजी जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनसुध्दा केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. लोकांच्या मनात कोरोना आजाराविषयी भीती असल्यामुळे उशिरा तपासणीसाठी येतात. ही बाब गंभीर असून लक्षण आढळताच तपासणी करण्याबाबत नागरिकात जनजागृती करावी, असे सर्वांचे मत होते.
जनता कर्फ्यू हा कडक आणि जिल्हाभर लागू करण्यात यावा, असे मत सर्वांनी मांडले. या काळात वैद्यकीय सेवा सुविधा वगळता सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी केली. यात प्रामुख्याने पेट्रोलपंप, दारु दुकान, ढाबा आदींचा बंदमध्ये समावेश असावा असा सुरही बैठकीत उमटला. परंतु आरोग्य सेवासुविधा कुठेही थांबणार नाही व बाधित होणार नाही याची काटेकार काळजी घेण्यावर सर्वांचे एकमत झाले.
भाजीपाला दुकानाची व्यवस्था विकेंद्रीत असावी असेही या बैठकीत ठरले. खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराबाबत शासकीय दराचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावावे असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयाला द्यावे. तुमसर येथे कोविड रुग्णालय उभारले असून लवकरच साकोली व पवनी येथे उभारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडत जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला. त्यामुळे आता दर शनिवार, रविवार कडक जनता कर्फ्यू आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना खासदार सुनील मेंढे म्हणाले, ही लढाई सर्वांची असून आपण सर्व एकत्रीतपणे लढा उभारण्याची गरज आहे. जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, हा सर्वपक्षीय निर्णय असून आता अशा परिस्थितीत दुसरा कोणताच पर्याय नाही. नागरिकांनी शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले सध्या तरी मास्क सुरक्षीत अंतर व वारंवार साबणाने स्वच्छ करणे हेच एकमेव कोरोनावरील औषध आहे. कुठलाही आजार अंगावर न काढता तात्काळ तपासणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देवून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची गरज आहे. मात्र अनेकदा नागरिक सर्व नियम पायदळी तुडवत रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसते.

पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ ऑक्टोंबर
कोरोना संक्रमानाची साखळी तोडण्यासाठी आता दर शनिवार, रविवारला जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे. याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध
जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध असून आणखी तीन हजार इजेक्शनची मागणी नोंदविली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन शासनाकडून प्राप्त होत आहे. गंभीर रुग्णालाच हे इंजेक्शन दिले जाते. कृपया इतर रुग्णांनी या इंजेक्शनची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Public curfew every Saturday-Sunday in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.