पं.स. माजी उपसभापतीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:23 IST2018-01-24T23:23:10+5:302018-01-24T23:23:55+5:30
लाखनी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे सक्रीय कार्यकर्ते संजय रामभाऊ शिवणकर (४७) यांनी २३ जानेवारीच्या मध्यरात्री लाखनी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पं.स. माजी उपसभापतीची गळफास घेऊन आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
लाखनी : लाखनी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे सक्रीय कार्यकर्ते संजय रामभाऊ शिवणकर (४७) यांनी २३ जानेवारीच्या मध्यरात्री लाखनी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
मनमिळावू स्वभावाचे असलेले संजय शिवणकर हे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सक्रिय सदस्य होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक संदेशचे ते प्रमुख होते. ते मुरमाडी (तुपकर) येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयात सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत होते.
मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्यात होते. अशातच त्यांनी मंगळवारच्या मध्यरात्री आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त लाखनी तालुक्यात पोहचताच नागरिकांनी लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला. लाखनी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारला दुपारी १ वाजता विहिरगाव (कन्हाळ्या) या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एक तरुण उत्साही कार्यकर्ता गमावल्याने संघ परिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.