The previous government had given up on farmers or farmers | गत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते

गत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गत पाच वर्षात राज्यातील सरकारने धानाचे भाव वाढविले नाही. केवळ धानाला २०० रुपयांचा बोनस तोही डिसेंबर २०१८ मध्ये घोषित केला. आम्ही निवडणुकीपुर्वी केलेली घोषणा अवघ्या १५ दिवसात अमलात आणली. गत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते, असा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.
तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, सुधाकर कारेमोरे, विठ्ठलराव कहालकर, रामदयाल पारधी, अमरनाथ रगडे, प्रमोद तितिरमारे, सुरेश रहांगडाले, राजू माटे उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, आमच्या सरकारने धानाला ५०० रुपये बोनस दिला. त्याशिवाय २०० रुपये अतिरिक्त मदत दिली. धानाला सध्या २५४० रुपये दर मिळत आहे. आम्ही करुन दाखविले. गत पाच वर्षात तुमसर- मोहाडी तालुक्यात दहशतीचे राज्य होत. शोषण सुरु होते. गाजर दाखवून कारभार सुरु होता. रेती चोरी, खंडणी, मनमानी, दादागिरी येथे सुरु होती. शेतकरी, कष्टकºयांच्या व्यथा व समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील मतदारांनी राजू कारेमोरे यांच्यावर विश्वास दाखविला. मतदारांचा भ्रमनिरास होणार नाही अशी ग्वाही खासदार पटेल यांनी दिली. कार्यक्रमाला राजेश देशमुख, पंचायत समिती उपसभापती शिशुपाल गौपाले, सरपंच गजानन लांजेवार, जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य संगीता मुंगुसमारे, प्रतीक्षा कटरे, प्रेरणा तुरकर, दिलीप भीवगडे, सरोज भुरे, रीता हलमारे, ठाकचंद मुंगुसमारे यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्र्यांची चिंता करु नका
उत्साही कार्यकर्त्यांनी यावेळी आमदार राजू कारेमोरे यांना मंत्री करण्याबाबत खासदार पटेलांना विनंती केली. तेव्हा त्यांनी तुम्ही मंत्री बनविण्याची चिंता करु नका. काम होणे महत्त्वाचे आहे. अख्खे मंत्रिमंडळ तुमसर विधानसभेत आणण्याची जबाबदारी माझी असे सांगून कामाकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

Web Title: The previous government had given up on farmers or farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.