श्वापदांचा धोका टाळण्यासाठी शौचालय बांधकामावर भर
By Admin | Updated: February 19, 2017 00:22 IST2017-02-19T00:22:55+5:302017-02-19T00:22:55+5:30
जंगलव्याप्त गाव म्हटल्यावर श्वापदांचा धोका संभवतो. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वेळप्रसंगी जीव गमवावे लागते.

श्वापदांचा धोका टाळण्यासाठी शौचालय बांधकामावर भर
स्वच्छता मिशन कक्षाचा पुढाकार : हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु
भंडारा : जंगलव्याप्त गाव म्हटल्यावर श्वापदांचा धोका संभवतो. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वेळप्रसंगी जीव गमवावे लागते. सोबतच उघड्यावर शौच केल्याने ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात येते. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आता ग्रामस्थ उघड्यावर शौचास जाणार नाही व त्यासाठी शौचालय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त असलेल्या आसलपानी येथे ग्रामस्थांनी हा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या पुढाकाराचा आदर्श जिल्ह्यातील अन्य गावांनेही घ्यावा असाच त्यांनी सुरु केलेल्या शौचालय बांधकामाच्या प्रगतीपथावरून दिसून येते. ओ.डी.एफ. अंतर्गत शौचालय बांधकाम करून गाव हागणदारीमुक्त करण्याचा मानस ग्रामपंचायत कमेटीने घेतला आहे.
आसलपानी, मोटागाव, गारकाभोंगा व कारली या चार गावांची गटग्रामपंचायत असलेल्या आसलपानीला ओडीएफ अंतर्गत २८७ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २०९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापर करण्यात येत आहे. उर्वरीत शौचालयाच्या बांधकामाची कामे प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसातच आसलपानी हे गाव हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने वाटचालीवर आहे.
आसलपानी या गावाला हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सुधाकर आडे यांनी भेट दिली.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच रेखा मरसकोल्हे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र पेंदाम, निला गोन्नाडे, शांता पेंदाम, माजी सरपंच नरेश पेंदाम, विस्तार अधिकारी घटारे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, समूह समन्वयक शशीकांत घोडीचोर, ग्रामपंचायत कर्मचारी ठाकरे, जलसुरक्षक रमेश गौपाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसलपानी ग्रामपंचायतीला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विविध उपक्रम, सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधकाम करण्याची जनजागृती करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
गावाची ओळख निर्माण करा - आडे
गाव हागणदारीमुक्त केल्याशिवाय विकासाच्या दिशेने नेता येत नाही. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी वॉर्डनिहाय, सदस्य निहाय दिवसागणिक नियोजनाची गरज आहे. यात स्वच्छता मिशन कक्षाचे पथक सहभागी होऊन चालणार नाही तर ग्रामस्थांनीही स्वत:ची ओळख ओळखून यात सहभागी व्हावे. शौचालय बांधणे हा मान सन्मानाचा विषय ठरला आहे. युवकांना उघड्यावर शौचास जाणे लज्जास्पद वाटत असल्याने ही एक महत्वाची बाब आहे. आरोग्य, शिक्षण व पाणी या मूलभूत गरजा योग्य असल्यास आरोग्य निरोगी राहील. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त करावे असे बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी मार्गदर्शन केले.