अध्यक्षांची लागणार कसोटी !
By Admin | Updated: July 19, 2015 00:44 IST2015-07-19T00:44:18+5:302015-07-19T00:44:18+5:30
जनसामान्यांच्या कल्याणाकरिता आयुष्य झिजविण्याएवढे दुसरे कोणतेही मोठे कर्म नाही.

अध्यक्षांची लागणार कसोटी !
मुखरु बागडे पालांदूर
जनसामान्यांच्या कल्याणाकरिता आयुष्य झिजविण्याएवढे दुसरे कोणतेही मोठे कर्म नाही. आपल्या हक्कातील कर्तव्याने जनसेवा करुन जीवनाचे सार्थक होणे फारच कमी लोकांना जमते. योगायोगाने बऱ्याच वर्षानंतर पालांदूर जवळील मुरमाडी (तुपकर) ला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या रूपात अंबरदिवा मिळाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. मागासलेपणा दूर होण्याकरिता मोठी मदत होईल, अशी आस धरीत जिल्हा परिषद अध्यक्षांना पालांदूर, पोहरा, मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासाचे मोठे आवाहन उभे झाले आहे.
पालांदूर गावाला पिणाच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुरु असलेली पाणी पुरवठा तोकडी पडत असून पुरक नळयोजना अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषदच्या अखत्यारित असल्याने लक्ष घालून न्यायाची अपेक्षा पालांदूरवासीय करीत आहेत. पालांदूर, मुरमाडीचे अंतर केवळ आठ किमीचे आहे. दिवसातून एकही बस या मार्गावर फिरकत नाही. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता एकही साधन नाही. लहान-मोठे ओढे अडवून पाणी सिंचनाकरिता दिल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.
खराशी-खुनारी-कोलारी या रस्त्याला मागील अनेक वर्षांपासून न्याय मिळाला नाही. रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. जिल्ह्याच्या टोकावर असल्याने व सक्षम नेतृत्व नसल्याने या भागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. आहे त्यात समाधान ठेवून परिसरातील नागरिक जीवन जगत आहेत.
खुनारी गावाला विजेची गंभीर समस्या आवासून उभी आहे. सरपंच हेमंत सेलोकर यांनी वाढीव पोल मागणी करुनही मंजुर होत नाही. मुरमाडी फिडरवर कृषी विजेची समस्या भयावह आहे. वीज अभियंता तक्रारींचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याने सामान्य व्यक्तीला लाखनी-साकोली-भंडारा येथे येरझऱ्या माराव्या लागतात.
जिल्हा परिषदच्या नवनियुक्त अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर यांचे मुरमाडी हे निवासस्थान आहे. याठिकाणी बाजाराला जागा नाही. शेतमालाला न्याय नाही. मुरमाडी हे पालांदूर पोलीस ठाण्यांतर्गत येते. त्यांच्या गावात अवैध धंदे फोफावल्याने सकाळ-सायंकाळ वर्दळीच्या ठिकाणी सभ्य व्यक्ती बसू शकत नाही. कायद्याची घडी बसविण्याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षांनी पुढाकार घेऊन ठाणेदार, बिट जमादार यांना समज द्यावी लागेल. जिल्हा परिषदच्या विकास निधीतून शक्य तितके निधीची जुळवाजुळव करुन लाखनी तालुक्यातील एकमेव खुनारी शिवतीर्थला पर्यटनाचा दर्जा देऊन सौंदर्यीकरण करण्याकरिता पुढाकार घेणे महत्वाचे आहे. खुनारी- स्मशानघाट - शिवतीर्थ रस्त्याला खडीकरण गरजेचे आहे.
पालांदूर वीज उपकेंद्रातूनच मुरमाडीला वीज पुरविली जाते. पालांदूर वीज केंद्राची क्षमता वाढविणे, दुतर्फा म्हणजे आसगाव-गडेगाव इथून वीज पुरविली जावी. शेतकऱ्यांना प्रलंबित वीज कनेक्शन पुरविणे, कर्मचारी संख्या वाढवावी वीज साहित्य उच्च दर्जाची असावी. यासारखी प्रलंबित वीज विभागाची कामे अध्यक्ष गिल्लोरकर यांना परिसराच्या विकासाकरिता प्राधान्याने करणे गरजेचे आहे.
पोहरा जिल्हा परिषद क्षेत्र लागूनच आहे. खनिज उद्योगाला चालना देऊन पोहरा क्षेत्रातील जनतेला न्यायाची अपेक्षा आहे. बिडी उद्योगालाही चालना देण्याची गरज आहे. हे क्षेत्र जंगलव्याप्त भागात असल्याने जंगलावर आधारित रोजगार निर्मितीवर भर देवून बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त करुन द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी बाळगली आहे.
या परिसरातील जनतेने एकंदरीत पालांदूर, पोहरा, मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहीत करुन जनसामान्याची आस पूर्ण करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांना मतदारांनी केल्यास त्यात अतिषयोक्ती होणार नाही.