सगळेच नगराध्यक्षपदाचे दावेदार!
By Admin | Updated: August 12, 2016 00:31 IST2016-08-12T00:31:20+5:302016-08-12T00:31:20+5:30
साकोली नगरपरिषद निवडणुका कधी होणार याची निश्चित माहिती नसताना देखील या निवडणुकीकरीता सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत.

सगळेच नगराध्यक्षपदाचे दावेदार!
साकोली : साकोली नगरपरिषद निवडणुका कधी होणार याची निश्चित माहिती नसताना देखील या निवडणुकीकरीता सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अजुनही जाहीर व्हायचे आहेत तरी शहरातील बहुतेक युवावर्ग व मातब्बर मंडळी अध्यक्षपदासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहात आहेत. मलाच नगराध्यक्ष व्हायचे आहे, अशी स्वप्ने अनेकजण रंगवित आहेत.
अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग या दोनपैकी एका वर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यास दोन्ही प्रवर्गातील कोणता उमेदवार आपल्या पक्षाचा राहणार हे देखील पक्षातर्फे निश्चित झाले आहे. फक्त निवडणुकीची तारीख व आरक्षण जाहीर होताच पक्षातर्फे लवकरच साकोली भावी नगराध्यक्ष कोण होणार, हे पक्षातर्फे जाहीर करण्यात येईल. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सुद्धा आपले उमेदवार प्रत्येक वॉर्डातून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे अनेकांनी नगराध्यक्षासाठी दावेदारी केल्यामुळे प्रभागामध्ये उमेदवार कोण द्यावेत, असा गंभीर प्रश्नही पक्षश्रेष्टीकडे निर्माण झाला आहे. एकदा का नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर झाले की सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. बहुतेक पक्षाच्या याद्या देखील तयार झाल्या आहेत.
येत्या १६ तारखेला प्रभागाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे असले तरी पक्षश्रेष्टी मात्र उमेदवार चाचपत आहेत. नुकतेच माजी मंत्री नितीन राऊत हे साकोलीत आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी हीतगुज साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांतही उत्साह संचारला तर भाजपाचे खासदार व आमदार स्थानिक असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांसह रोजच्याच आहेत. राष्ट्रवादीतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हेही स्थानिक असल्यामुळे कार्यकर्त्यांशी रोजच संवाद साधत आहेत. हे सर्वकाही असले तरी आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना उत्साह येत नाही एवढे मात्र खरे. (तालुका प्रतिनिधी)