करडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; चालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:14+5:302021-04-02T04:37:14+5:30
करडी परिसरातील बहुतेक सर्वच मार्ग खड्ड्यांनी गजबजले आहेत. देव्हाडा ते पालोरा, मुंढरी ते करडी, पालोरा ते खडकी- ढिवरवाडा, बोरगाव ...

करडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; चालक त्रस्त
करडी परिसरातील बहुतेक सर्वच मार्ग खड्ड्यांनी गजबजले आहेत. देव्हाडा ते पालोरा, मुंढरी ते करडी, पालोरा ते खडकी- ढिवरवाडा, बोरगाव ते पालोरा, मुंढरी खुर्द पोचमार्ग, मुंढरी बुज पोचमार्ग, निलज खुर्द पोच मार्ग, निलज बुज पोच मार्ग, पालोरा ते जांभोरा, करडी ते दवडीपार, निलज बुज, निलज खुर्द, मुंढरी बुज पोच मार्ग या रस्त्यांकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, जीवघेणे ठरत आहेत.
विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची या मार्गावरून मोठी वर्दळ असते. नागरिकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे याच मार्गाने नेण्यात येते. मात्र, दुर्लक्षामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाही. किरकोळ अपघात होण्याची बाब तर नित्याची होऊन बसली आहे. रस्त्याच्या संबंधाने अधिकाऱ्यांना अनेकदा माहिती देण्यात आलेली असताना अधिकारी कार्यालयात बसून दिवस काढण्यात व्यस्त असतात. करडी परिसरातील सर्वच स्त्यांवरील खडी उखडली असून, खोल खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांसाठी रस्ते मृत्यूचा मार्ग ठरू पाहत आहेत. सदर मार्ग आता प्रवाशांच्या अंताची प्रतीक्षाच जणू करीत असल्याचे भासत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची ओरड सुरू असतानाही बांधकाम विभाग दुरुस्तीचे सौजन्य दाखविताना दिसत नाही.
या मार्गाचे डांबरीकरण होऊन बराच कालावधी लोटला आहे. त्यामुळे या मार्गावरील डांबर उखडून खोल खड्डे पडले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुरवस्थेमुळे नागरिकांचा हकनाक जीव जाण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे मणक्यांचे आजार वाढले आहेत. सदर मार्गाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने मौका पाहणी करून डांबरीकरण तसेच मजबुतीकरण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
बॉक्स
पालोरा ते साकोली रस्त्याचे बेहाल
पालोरा ते साकोली राज्यमार्गाचे बेहाल झाले आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. बांधकाम विभाग धृतराष्ट्राच्या भूमिकेत वागताना दिसून येतो. या राज्यमार्गावर अनेक अपघात होऊन अनेकजण जखमी झाले. लाखांचा खर्च करावा लागला. एकाचा मृत्यूही झाला. परंतु बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी खेचून आणण्यात अपयशी ठरला आहे.