पोलिसांचे वाहन नवजात बाळासाठी झाले रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:27+5:30

वाहनचालक भूपेंद्र बावनकुळे यांना परिस्थिती सांगितली. त्यांनीही क्षणाचा विचार न करता कर्तव्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असे समजून थेट बाळ आणि बाळंतीणीला आपल्या वाहनात बसविले. काही वेळातच रुग्णवाहिका झालेले पोलिसांचे वाहन लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पोहचले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या वाहनाने भंडारा येथे रुग्णालयात नेण्यात आले.

 Police vehicle accident ambulance for infant | पोलिसांचे वाहन नवजात बाळासाठी झाले रुग्णवाहिका

पोलिसांचे वाहन नवजात बाळासाठी झाले रुग्णवाहिका

googlenewsNext
ठळक मुद्देचालकाची माणुसकी : बाळ-बाळंतीण सुखरूप, आरोग्य विभाग बेफिकीर

हेमंत मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : नेहमी आरोपींना पकडून ठाण्यात नेणाऱ्या पोलीस वाहनाला सोमवारी वेगळेच कर्तव्य पार पाडावे लागले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने चालकाने चक्क नवजात बालकाला आपल्या वाहनातून थेट ग्रामीण रुग्णालयात पोहचविले. वेळेवर उपचार मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे दर्शन लाखनी तालुक्यातील भागडी गावकऱ्यांना झाले. लाखनी पोलिसांच्या या कर्तव्याचे सर्वत्र कौतूक होत असताना आरोग्य विभागावर मात्र तेवढाच संताप व्यक्त करण्यात आला.
लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील आरोग्य उपकेंद्रात सीमरण राहुल बोदेले या मातेने सोमवारी दुपारी ३.३० वाजता एका बाळाला जन्म दिला. मात्र जन्मताच बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथे उपचार करणाऱ्या परिचारिकेच्या लक्षात आले. तीने बाळाला तात्काळ लाखांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची शोधाशोध केली. परंतु रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. आता करायचे काय असा प्रश्न पडला असतानाच सावित्रीबाई फुले पुतळा अनावरणासाठी पोलिसांचे वाहन गावात आले होते. गावकऱ्यांनी तेथे धाव घेतली.
वाहनचालक भूपेंद्र बावनकुळे यांना परिस्थिती सांगितली. त्यांनीही क्षणाचा विचार न करता कर्तव्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असे समजून थेट बाळ आणि बाळंतीणीला आपल्या वाहनात बसविले. काही वेळातच रुग्णवाहिका झालेले पोलिसांचे वाहन लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पोहचले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या वाहनाने भंडारा येथे रुग्णालयात नेण्यात आले. अगदी वेळेवर पोलिसांचे वाहन मदतीला आले नसते तर मोठी अघटीत घटना घडली असती.
चालक भूपेंद्र बावनकुळे यांनी खाकी वर्दीत लपलेली माणुकसकी जोपासली आणि त्यामुळे बोदेले परिवाराच्या वंशाच्या दिव्याला वेळेवर उपचार मिळाले. पोलिसांच्या या रुग्णसेवेचे सर्वत्र कौतूक होत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर खरी जबाबदारी आहे तो आरोग्य विभाग निद्रिस्त असल्याने संतापही व्यक्त होत आहे.

आरोग्य सेवा सलाईनवर
लाखांदूर तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर आल्याचे दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य उपकेंद्रातही रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णाला भंडारा येथे रेफर करण्याची घाई तेथील अधिकारी व कर्मचाºयांना झालेली असते. रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या आरोग्य सेवेला सलाईन लावून दुरुस्त करावे अशी मागणी आहे.

Web Title:  Police vehicle accident ambulance for infant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस