बपेरा पोलीस चौकीचा प्रश्न सुटणार!
By Admin | Updated: August 17, 2014 22:59 IST2014-08-17T22:59:55+5:302014-08-17T22:59:55+5:30
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकीचा प्रस्ताव विचाराधीन असताना प्रशासनाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. जागेची मागणी असलेला प्रस्ताव ५०० मीटरचे अंतर गाठण्यासाठी

बपेरा पोलीस चौकीचा प्रश्न सुटणार!
चुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकीचा प्रस्ताव विचाराधीन असताना प्रशासनाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. जागेची मागणी असलेला प्रस्ताव ५०० मीटरचे अंतर गाठण्यासाठी महिनाभराचा कालावधी घेत असल्याने चिंता बळावली आहे.
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर कायमस्वरुपी पोलीस चौकी निर्माण करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. इमारत बांधकामासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देवसर्रा गावाच्या हद्दीत इमारत बांधकाम जागेचा शोध घेण्यात येत आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्ग क्र. २७१ वर गट क्र. १३१ जागेत ०.१५ आर जागा शिल्लक आहे. ही जागा पोलीस चौकीकरीता महसूल विभागाने उपलब्ध करावी, या आशयाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या दप्तरात प्राथमिक स्तरावरुन सदर प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यात ५०० मीटर अंतरावर आहेत. परंतु प्रस्तावाला मंजुरी देताना महिनाभराचा कालावधी लागत आहे. पोलीस चौकी निर्मितीकरीता जिल्हा पोलीस प्रशासन गंभीर असताना महसूल विभाग मात्र प्रस्तावाला हिरवी झेंडी देताना विलंब करीत आहे. शासकीय कामे तथा जागेच्या सुरक्षेचे प्रश्न जलद गतीने निकाली काढण्यात आली पाहिजेत. परंतु जिल्ह्यात असे चित्र नाही. रिमार्क देऊन फाईल पुढे सरकविण्याची जलद गतीची प्रक्रिया यंत्रणा पार पाडत नाही. यामुळे अनेक प्रकरणे रेंगाळत आहे. खुद्द पोलीस विभाग हा फटका अनुभवत आहे. जागा उपलब्ध झाले असता, इमारत बांधकामाचे अनेक प्रक्रिया आहेत. प्रथम पायरीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. तसे करण्यात येत नाही. दरम्यान बपेरा आंतरराज्यीय सीमेवर अस्थायी पोलीस चौकी तैनात करण्यात आली आहे. राहुटीत पोलीस कर्तव्य बजावत आहेत. ऐन पावसाळ्यात साप-विंचवाची धाकधुकी पोलिसांच्या मनात आहे. रात्री अनेक विषारी सापांचा अनुभव पोलिसांना आलेला आहे. जनतेची सुरक्षा करणारे पोलीसच असुरक्षीत झाली आहेत. पिण्याचे पाणी, वीज आदी नाहीत. गाऱ्हाणे सांगितले तर ऐकणारे नाहीत. अशी स्थिती या पोलिसांची आहे. या सीमेवरुन नक्षलग्रस्त बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्याची सीमा हाकेच्या अंतरावर आहे. कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांच्या हातात दांडा आणि दिवा आहे. हे या जिल्ह्याचे हायटेक पोलीस आहेत. आंतरराज्यीय सीमा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची ओरड जुनीच आहे. परंतु तसे जलद गतीने प्रयत्न होत नाहीत. यामुळे कालावधी पूर्ण झाले असतानाही प्रकरणे निकाली निघत नाहीत. (वार्ताहर)