पोलीस हेल्पलाइन कक्ष पोलिसांसाठी ठरला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:53+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात तसेच त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांड प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध मंत्री दौऱ्यावर राहिले. यामुळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीच घेता आली नाही. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे कर्तव्य पार पाडताना पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ होते. जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयात हेल्पलाइन कक्षात वर्षभरात ७८ तक्रारी प्राप्त झाल्या.

पोलीस हेल्पलाइन कक्ष पोलिसांसाठी ठरला आधार
संतोष जाधवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपली तक्रार देता यावी यासाठी शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस हेल्पलाइन कक्षाची स्थापना केली आहे. अनेक पोलीस कर्मचारी हेल्पलाइनवर तक्रार करतात. यात मेडिकल बिल, पदोन्नतीच्या तक्रारी, तसेच वेतननिश्चिती, किरकोळ रजा मिळण्यासाठी अशा विविध तक्रारींचा समावेश असतो. तक्रारींची दखल घेत अनेक निवारण होत असल्याने ही हेल्पलाइन पोलिसांसाठी आधार ठरली आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात तसेच त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांड प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध मंत्री दौऱ्यावर राहिले. यामुळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीच घेता आली नाही. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे कर्तव्य पार पाडताना पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ होते. जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयात हेल्पलाइन कक्षात वर्षभरात ७८ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात सर्वाधिक २१ तक्रारी मिळाल्या. त्यानंतर फेब्रुवारी १२, मार्चमध्ये चार, एप्रिल महिन्यात पाच, मे महिन्यात तीन, जून १३, जुलै पाच, ऑगस्टमध्ये पाच, सप्टेंबर महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी तीन तक्रारी तर डिसेंबरअखेर चार तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या होत्या. यातील ७६ तक्रारींचे निवारण करण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. मात्र काही कारणास्तव वेतननिश्चितीची दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र असे असले तरी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करणारा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या बाबूंविषयी नाराजी असल्याचे दिसून येते. अनेकदा सेवानिवृत्तीनंतर आपली पेन्शन, फंड, आपली मेडिकल बिले लवकर मंजूर करताना अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना बाबूंकडून वेठीस धरल्याचीही माहिती आहे. असे असले तरी ही हेल्पलाइने आधार ठरत आहे.
७६ तक्रारींचे निवारण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त तक्रारींमध्ये विविध पुरुष, महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. वर्षभरात शहरात वर्षभरात ७८ तक्रारींपैकी ७६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. राज्यात इतर जिल्ह्याची तुलना करता भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यात चांगले यश मिळवले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस येथे तक्रार करून आपली माहिती देतात.
पोलीसाला अश्रू अनावर
पोलीस म्हटले, धडकी भरवणारा आवाज हा ठरलेला. मात्र त्या पोलिसालाही भावना असतात. याचा प्रत्यय आला. एका पोलीस आपले अनुभव कथन करताना कधी व्यसन केले नाही, सुपारी खाल्ली नाही. एक दिवस दुचाकीवरून जात असताना वन्यप्राण्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालो. त्यावेही रूग्णालयाचे बिल सहकाऱ्यांनीच भरले. माझे मेडिकल बिल प्रलंबित आहे, अशी भावना बोलून दाखवताना एका पोलिसाला अश्रू अनावर झाले.