‘डिजिटलायझेशन’पासून पोलीस मुख्यालय दूरच
By Admin | Updated: October 28, 2015 00:57 IST2015-10-28T00:57:26+5:302015-10-28T00:57:26+5:30
राज्य पोलीस दलाने ‘डिजिटलायझेशन’कडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र, भंडारा जिल्हा पोलीस विभागाची वेबसाईट तयार नसल्याची बाब समोर आली आहे.

‘डिजिटलायझेशन’पासून पोलीस मुख्यालय दूरच
अद्ययावत वेबसाईटचे काम सुरु : महासंचालनालयाने दिले निर्देश
भंडारा : राज्य पोलीस दलाने ‘डिजिटलायझेशन’कडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र, भंडारा जिल्हा पोलीस विभागाची वेबसाईट तयार नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पोलीस महासंचालनालयाने १० नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळ सुरू करण्याची समज दिली आहे.
भंडारा जिल्ह्यासह महाराष्ट्र पोलीस दलातील थोडेथोडके नव्हे तर १४ जिल्हे ‘डिजिटलायझेशन’ पासून कोसो दूर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, औरंगाबादपासून वर्धापर्यंतच्या अनेक जिल्हा पोलीस दलाची अद्याप साधी वेबसाईटही (संकेतस्थळ) उपलब्ध नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे या सर्व जिल्हा पोलीस मुख्यालयांना पोलीस महासंचालनालयातून समज देण्यात आली. सोबतच त्यांना लवकरात लवकर संकेतस्थळ निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
एका भागात गुन्हे करून दुसऱ्या भागात पळून जायचे. तेथे गुन्हे केल्यानंतर तिसऱ्या भागात पळून जायचे अशी काही सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या टोळयांची कार्यपद्धत आहे. त्यामुळे हे गुन्हेगार वर्षानुवर्षे पोलिसांच्या हाती लागत नाही. ते लक्षात आल्यामुळे देशभरातील पोलिसांना ‘आॅनलाईन’ करण्याचा विचार पुढे आला. त्यातून ‘क्राईम अँन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम’ (सीसीटीएनएस) तयार करण्यात आली.
या सिस्टिममुळे देशभरातील गुन्हे आणि गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्याचे सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न प्रत्यक्षात आले. महाराष्ट्र पोलीस दलाने देशात सर्वप्रथम सीसीटीएनएसची सुरुवात करून आघाडी घेतली. सीसीटीएनएस प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा १५ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते नागपुरात पार पडला. पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाईन करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याचे गौरवोद्गार उपस्थित अथितींनी काढले.
सीसीटीएनएसच्या रूपाने राज्यातील १,०४१ पोलीस ठाणे आणि पोलीस अधिकाऱ्यांची ६३८ कार्यालये संलग्न झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. यानंतर ३० सप्टेंबरला पोलीस महासंचालक संजीव दयाल निवृत्त झाले. राज्याचे नवीन डीजी म्हणून प्रवीण दीक्षित यांनी सूत्रे स्वीकारली. पारदर्शी कारभाराला आधीपासूनच प्राधान्य देणाऱ्या नव्या डीजींच्या लक्षात राज्यातील पोलीस दलाची ‘आॅनलाईन’ परिस्थिती लगेच आल्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले आहेत. (शहर प्रतिनिधी)