डॉक्टरकीच्या नावावर लूट
By Admin | Updated: June 28, 2014 00:58 IST2014-06-28T00:58:42+5:302014-06-28T00:58:42+5:30
पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात ४० गावांचा समावेश होतो. या गावातील बहुतांश नागरिक, शेतकरी, शेतमजूर असल्यामुळे ...

डॉक्टरकीच्या नावावर लूट
अड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात ४० गावांचा समावेश होतो. या गावातील बहुतांश नागरिक, शेतकरी, शेतमजूर असल्यामुळे या गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटून सामान्य गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु केला आहे. अड्याळ परिसरात २० हून अधिक बोगस डॉक्टरांची संख्या, बोगस डॉक्टरांमुळे परिसरात गर्भपाताची संख्या उंचावली आहे. अड्याळ येथील काही औषध विक्रेत्यांशी बोगस डॉक्टरांसोबत साठगाठ असल्याची माहिती आहे.
रोगांचे योग्य निदान होेऊन आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रशिक्षण महाविद्यालये शासनस्तरावर उघडण्यात आली आहेत.
यामध्ये लाखो रुपये खर्च करून विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना डॉक्टर ही पदवी देऊन समाजातील रुग्णांची सेवा करण्यासाठी संधी मिळते. तर दुसरीकडे भयानक व विदारक चित्र अड्याळ विभागात दिसत आहे. या डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषधही देण्यात येत आहे.
या भागात एखाद्या औषधी विक्रेत्यांकडे किंवा डॉक्टरांकडे महिन्याकाठी वेतनावर काम करणारा व्यक्ती दोन ते तीन वर्ष काम केल्यानंतर स्वत:ला डॉक्टर समजवून बसतो. स्वत:ची बोगस दुकानदारी सजवून लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु करतो.
अड्याळ व परिसरातील नेरला, चकारा, तिर्री, मिन्सी, कातुर्ली, केसलवाडा, सालेवाडा व नवेगाव व अन्य गाव परिसरात किमान २० हून अधिक अप्रशिक्षित म्हणजे बोगस डॉक्टरांनी अन्न औषध प्रशासन व पोलीस विभागाला न जुमानता राजरोसपणे गावागावात खुलेआम डॉक्टरकीचे फलक लावून दुकानदारी थाटली आहे. परिसरात गोर गरीब जनता जास्त असल्याने व गावातच डॉक्टर सहज उपब्ध होत असल्यामुळे या बोगस डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या भरमसाठ आहे.
ङ्क्तयातील काही बोगस डॉक्टर घरोघरी जावून औषधोपचार करतात. स्वत:जवळ अॅलोपॅथीक औषधे इंजेक्शन, सलाईन तसेच स्टेराईडच्या गोळ्या वापरून उपचार करतात. त्यामुळे औषधीचे वाईट परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेवर होऊन उपचाराला बळी पडत आहेत. औषध दुकानदार बोगस डॉक्टरांना चोरी छुपे औषध वितरीत करतात अशी माहिती आहे. प्रशिक्षित डॉक्टरांसारखे हे बोगस पदवीधारक डॉक्टर मोठ्या आजारापासून तर गर्भपातापर्यंतचे उपचार रुग्णांवर करीत आहेत. अशा अप्रशिक्षित डॉक्टरांकडून होत असलेल्या उपचारामुळे कित्येक रुग्णांना गंभीर आजाराला बळी पडावे लागले आहेत. अशा बोगस डॉक्टरांच्या अवैध दुकानदारीला हाणून पाडण्यासाठी अड्याळ परिसरातील गावागावात अन्न औषधी प्रशासन अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी अड्याळ परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)