यंत्राच्या सहायाने २० हेक्टरमध्ये रोवणी
By Admin | Updated: July 24, 2015 00:34 IST2015-07-24T00:34:24+5:302015-07-24T00:34:24+5:30
शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती कशी साधता येईल यावर कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात.

यंत्राच्या सहायाने २० हेक्टरमध्ये रोवणी
कृषी विभागाचा दावा : कमी खर्चात जास्त उत्पन्न
साकोली : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती कशी साधता येईल यावर कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून तालुका कृषी विभागाच्या वतीने साकोली तालुक्यात २० हेक्टर शेतातील रोवणी भात लागवड यंत्राच्या सहाय्याने मोफत करून दिली.
यात विहीरगाव, वांगी, पाथरी व बोदरा या गावाचा समावेश आहे. या यंत्राच्या रोवणीमुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते असा दावा कृषी विभागाचा आहे. यंत्राद्वारे रोवणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे एप्रिल महिन्यापासूनच मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले होते. त्यानुसार फक्त काही शेतकरी या रोवणीसाठी तयार झाले. त्यांचाच शेतात पऱ्ह्याची सोय करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
पऱ्ह्यांची लागवड
यंत्राच्या सहायाने रोवणी करण्यासाठी शेतात आधी प्लास्टिक पसरून माती टाकली जाते. नंतर त्यात चौकोनी बेड तयार करून त्यात धान टाकावे लागत असून रोवणीसाठी हे बेड काढावे लागतात व खाली टाकलेले प्लास्टिक बाहेर फेकावे लागते.
उत्पन्नात वाढ
यंत्राच्या सहाय्याने केलेली रोवणी ही एका रांगेत होत असून मधात अंतर ठेवले जाते. त्यामुळे सूर्यप्रकाश व वारा योग्य प्रमाणात शिरतो. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो व धानही योग्य प्रमाणात वाढते. त्यामुळे नक्कीच उत्पन्न जास्त येते. या पद्धतीने रोवणी करण्यावर कृषी विभाग जोर देत आहे.