पर्यटनाकरिता नियोजनाची गरज

By Admin | Updated: September 27, 2015 00:32 IST2015-09-27T00:32:38+5:302015-09-27T00:32:38+5:30

पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.

Planning for tourism needs | पर्यटनाकरिता नियोजनाची गरज

पर्यटनाकरिता नियोजनाची गरज

आज पर्यटन दिन : पवनीत संधी
पवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता पर्यटनात आहे. पण पर्यटनाचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन करण्यात येत नसल्यामुळे पर्यटनाचा विकास झालेला नाही. पर्यटन क्षेत्र विकसित करण्याकरिता एक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यात विदर्भातील सर्वात मोठे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पत्ता मेत्ता संघ द्वारा निर्मित आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधी महास्तुप, शहरातील प्राचीन, ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभेस्वामी मंदिर, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटनस्थळांसोबत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी वन्यजीव वनक्षेत्र आदींचा समावेश आहे.
मागील तीन चार वर्षापासून पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पवनी शहराचा पर्यटन शहराच्या रुपात विकास होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे.
या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. पर्यटन वाढेल त्यामुळे रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शहराचे गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे.
ऐतिहासिक पवनी शहराची जनता ही शहरामध्ये पर्यटन वाढण्याच्या बाजूने आहे. येथील जनतेच्या भावना पर्यटनस्थळाच्या विकासाशी जुळलेल्या आहेत. मागील चार वर्षापासून शासनातर्फे पर्यटन विकासाचा कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही. ऐतिहासिक किल्ल्याखालील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे तयार होत असलेले पर्यटन संकुल आठ दहा वर्षे झाले तरी अजून तयार झाले नाही.
येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाच्या पर्यटनस्थळाच्या यादीत आणणे, पर्यटनस्थळांना शासन स्तरावर प्रसिद्धी देणे, पर्यटनस्थळाचा विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी विषयावर विचार करून एक पर्यटन विकास आराखडा तयार करून शासनस्तरावर नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास होण्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Planning for tourism needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.