मजुरांना नेणारे पिक अप वाहन उलटले, एकाचा मृत्यू, १५ जखमी
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 6, 2024 13:56 IST2024-12-06T13:54:55+5:302024-12-06T13:56:08+5:30
मोहाडी तालुक्यातील टोकावर असलेल्या करडी / पालोरा या गावापासून येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळ मजुरांना कामावर घेऊन जाणारे पिक अप वाहन उलटले.

मजुरांना नेणारे पिक अप वाहन उलटले, एकाचा मृत्यू, १५ जखमी
भंडारा : मोहाडी तालुक्यातील टोकावर असलेल्या करडी / पालोरा या गावापासून येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळ मजुरांना कामावर घेऊन जाणारे पिक अप वाहन उलटले. यात एका मजुराचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर १५ जखमी झाले. सर्व जखमींवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता हा अपघात घडला.
मृत मजुराचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम शेंद्रे (६०) असून भंडारा येथे उपचारासाठी पाठवलेल्या गंभीर जखमीचे नाव राकेश आंबेडहारे असे आहे. तर, जखमींमध्ये सुरेश फत्तु गजभिये (२८), कैलास लक्ष्मण शेंद्रे (३२), हिरालाल हनु भानारकर (४५), नरेंद्र कीसन धुर्वे (४२), राजकुमार नारायण बावनथळे (४२), राकेश ज्ञानेश्वर आकरे (४०), मुकेश दुधराम रामटेके (२८), शेखर पांडू नेवारे (३२), प्रमोद रामा नागोसे (३५), धनराज जैराम बावनथडे (३२), भिमराव जैराम बावनथडे (४०), रामेश्वर सुधारक नेवारे (२६), विजय राजीराम बावथडे (४८), विश्वास तुळसिदास रामटेके (२७) यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर साकोली तालुक्यातील उसगाव येथील आहेत. करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी निषा पांडे यांनी प्राथमिक उपचार करून या सर्वांना पुढील उपचारासाठी तुमसरला रवाना केले.
तिरोडा तालुका विहीरगाव यथे सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर हे सर्वजण ठेकेदारी मजूर होते. सकाळी ७:३० वाजता ते सर्वजण पिक अप वाहनातून (क्रमांक एमएच ३६ / एए ३१२८) कामावर निघाले होते. दरम्यान, करडी गावाजवळील पॉवर हाऊसजवळ अचानकपणे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे पिक अप उलटला. हा प्रकार लक्षात येताचा गावकरी धाऊन आले. त्यांनी सर्व जखमींना गावच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.
गावकऱ्यांनी केली मदत
अपघाताची माहिती कळताच करडी येथील सरपंच निलीमा ईलमे व माजी सरपंच महेंद्र शेंडे यांच्यासह गावकरी मदतीला धावून आले. नागरीकांच्या मदतीने सर्वांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यासाठी मोठी धावपळ केली.करडीचे पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन भंभीर जखमी असलेल्या दोघांना आपल्या वाहनातून तुमसरला पाठविले. वाहन चालक रंजित केसर रामटेके (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन पोलिसात जमा करण्यात आले आहे.