फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धांचे अर्थशास्त्र
By Admin | Updated: April 14, 2016 00:46 IST2016-04-14T00:46:54+5:302016-04-14T00:46:54+5:30
महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत.

फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धांचे अर्थशास्त्र
श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन : ‘भारत गणराज्याचे विधिवत नामकरण’ ग्रंथाचे प्रकाशन
भंडारा : महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत. सत्यशोधकी पत्रकारीतेचा पाया सुद्धा फुले-आंबेडकरांनी घातला. डॉ. आंबेडकर हे घटनात्मक नैतीकतेचे नाव आहे. ते धम्माला घटनेच्या नैतीकतेचे अधिष्टान देऊ इच्छित होते. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरीता फुले-आंबेडकर अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे. कारण फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धाचे अर्थशास्त्र सांगते, असे रोखठोक विचार प्रसिद्ध कवी व साहित्यचिंतक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे ११ एप्रिल रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित आजचे समाजवास्तव आणि फुले-आंबेडकरी विचार या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, महेंद्र गडकरी, अश्ववीर गजभिये, अमृत बन्सोड व निशांत राऊत होते. ते म्हणाले की, फुले-आंबेडकरी विचाराविरूद्ध सुरू असलेली प्रतीक्रांती हे आजचे समाजवास्तव आहे. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेती नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी न होणे, रोहित वेमुला आणि कन्हैय्याकुमार यांच्यावर सूडबुद्धीने कार्यवाही करणे, पुरोगामी दाभोळकर-पाणसरे-कलबुर्गी यांची हत्या करून फुले-आंबेडकरी विचार संपविण्याचा प्रयत्न करणे, विकासाच्या नावाखाली विनाशाचा दहशतवाद पसरविणे या सर्व घटना आजचे समाजवास्तव आहे.
याप्रसंगी भारत गणराज्याचे विधिवत नामकरण या प्रा. अश्ववीर गजभिये लिखित ग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, युनोमध्ये सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. म्हणजे ते विश्वमानव होते याचे प्रतीक आहे. आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत. ते परीपूर्ण मानव होते म्हणून त्यांचे निव्वळ व्यक्तीपूजक होण्यापेक्षा त्यांचे विचाराचे पुजक व्हायला पाहिजे. तसेच त्यांचे आर्थिक विचार अंगीकारून आर्थिक प्रगती आपण साधली पाहिजे.
डॉ. अनिल नितनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर पाश्चिमात्य विचारवंत व तत्ववेते यांचा प्रभाव पडला असल्याचा उहापोह करून डॉ. आंबेडकर केवळ एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे, असे सांगितले.
व्याख्यानाचे संचालन व प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी, आभार असित बागडे यांनी तर संयोजन गुलशन गजभिये यांनी केले. व्याख्यानाकरीता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समितीचे अध्यक्ष निशांत राऊत, सचिव अजय तांबे, महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, डॉ. रविंद्र वानखेडे, गुलशन गजभिये, प्रभाकर भोयर, डी.एफ. कोचे, संजय बन्सोड, अजय गडकरी, सुनित नगराळे, हरिश्चंद्र दहिवले, अमित उके, प्रशांत बागडे, प्रशांत सूर्यवंशी, संदेश शेेंडे, रूपचंद रामटेके, करण रामटेके, किशोर मेश्राम, शरद खोब्रागडे, शैलेश मेश्राम, मोनू गोस्वामी, अरुण अंबादे, नितीन मेश्राम, दिनेश गोस्वामी आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)