आर्थिक विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 01:06 IST2016-02-19T01:06:28+5:302016-02-19T01:06:28+5:30
आर्थिक विकास साधायचा असेल तर आर्थिक मजबुती मिळवून देणाऱ्या संस्थानच्या किंवा बँकांच्या आर्थिक विकासात

आर्थिक विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
भंडारा : आर्थिक विकास साधायचा असेल तर आर्थिक मजबुती मिळवून देणाऱ्या संस्थानच्या किंवा बँकांच्या आर्थिक विकासात नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेवे यांनी केले.
जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट व सामान्य नागरिकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि भंडारा सेंट्रल को आॅपरेटिव्ह बँकेच्या वतीने आज गुरूवारी बँकेच्या मुख्य शाखेत रूपे किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अनावरण, आर्थिक साक्षरता केंद्र व एटीएम केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी सुखदेवे बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, रिझर्व्ह बँकेच्या योगिता खोब्रागडे, नाबार्डचे ललीत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अरविंद खापर्डे, जिल्हा उपनिबंधक संजय क्षीरसागर, अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे उपस्थित होते.
एम.एल. सुखदेवे म्हणाले, पुर्वी जी आर्थिक परिस्थिती होती ती आजही पहावयास मिळते. आर्थिक घडामोडींचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी स्थिती दिसून येते. नाबार्ड व रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी विकासाबाबत चर्चा होत असतात. अशावेळी नागपूर, मुंबई, पुणे या महानगरांची आर्थिक स्थिती आणि भंडाराची आर्थिक स्थिती यात बरेच अंतर आहे. भंडारा जिल्ह्यात पाणी आहे पण त्यावर आधारित उद्योग नाहीत. उद्योग उभे राहिले तर आर्थिक विकास आपोआप होतो. शेतकरी महिला बचत गट यांनी साधनांचा उपयोग करून व्यवसाय करावा व त्यातून आर्थिक पाया मजबूत करावा, असे आवाहनही सुखदेवे यांनी केले.
बँकेच्या मुख्य शाखेत रूपे किसान क्रेडीट कार्ड योजनेचे अनावरण, आर्थिक साक्षरता केंद्र व एटीएम केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे प्रास्ताविकात म्हणाले, महाराष्ट्र राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांकडे नाबार्ड व रिझर्व बँकेकडे मागण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. यात ग्रामीण स्तरावरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण, नाबार्ड व राज्य बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर एकसमान ठेवणे आदी मागण्यांचा समावेश आहे. राज्यात भंडारा जिल्ह्यालाच सहा आर्थिक साक्षरता केंद्र मिळाले हे या बँकेचे मोठे यश असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, नाबार्डचे ललीत जाधव यांनीही मार्गदर्शन केले. संचालन डॉ.प्रकाश मालगावे यांनी तर आभारप्रदर्शन बँकेचे संचालक प्रेमसागर गणवीर यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रामलाल चौधरी, कैलाश नशिने, नरेंद्र बुरडे, प्रशांत पवार, डॉ.श्रीकांत वैरागडे, सत्यवान हुकरे, विजय खोब्रागडे यांच्यासह अन्य संचालक व बँकेचे पदाधिकारी व अधिकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)