वैनगंगा नदीतून नागरिकांना ‘स्लो पॉयझन’
By Admin | Updated: December 5, 2015 00:36 IST2015-12-05T00:36:39+5:302015-12-05T00:36:39+5:30
जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे दुषीत झाली आहे.

वैनगंगा नदीतून नागरिकांना ‘स्लो पॉयझन’
मासोळीचे प्रजोत्पादन घटले : नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटका
प्रशांत देसाई भंडारा
जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे दुषीत झाली आहे. दूषित पाणी नदी प्रवाहात सोडण्यात येत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन होणाऱ्या मासोळ्यांच्या प्रमाणातही यावर्षी घट झाली आहे. हे दूषित पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल 'नीरी'ने दिला आहे. यामुळे जीवनवाहिनी वैनगंगा मृत्युवाहिनी झाल्याची प्रचिती येत आहे.
भंडारा जिल्ह्यातून वाहनारी वैनगंगा नदी येथील नागरिकांची जीवनवाहिनी आहे. या नदीचे पात्र अवाढव्य असून येथून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा शेतीला फायदा व्हावा यासाठी शासनाने महत्वकांक्षी असा गोसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प उभारला. लाखो नागरिकांना वैनगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी मिळत आहे. यासोबतच, गोसेखुर्दमुळे हजारो हेक्टरमधील शेतातील पिकांनाही ते सोडण्यात येत असल्याने नागरिक व शेतीसाठी ही नदी जीवनवाहिनी ठरली आहे.
मात्र, मागील काही वर्षांपासून नागपूर येथील अत्यंत दुषीत पाणी नाग नदीच्या मुख्य प्रवाहात सोडण्यात येत आहे. हे पाणी आंभोरा येथील संगमावरून वैनगंगा नदीपात्रात विसर्जित होत आहे. नाग नदीत नागपूर येथील काही कारखाने व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसाय तथा अन्य प्रकल्पातून रासायनिकयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नाग नदीच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत आहे. यामुळे नदीलगतच्या गावांमधील हजारो नागरिकांना या दुषीत वाण्याच्या दुर्गंधीचा जबर त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा प्रवाह असल्याने ते वाहत होते. मात्र, आता पावसाळा नसल्याने व गोसेखुर्द प्रकल्पामुळे पाणी अडविण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह थांबला आहे. यामुळे प्रवाहविरहीत पाणी एकाच जागेवर थांबल्यामुळे हे काळेकुट्ट पाण्यातून अत्यंत दुर्गंधी येत आहे. वैनगंगा नदीवरून प्रवास करताना या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे असून नागपूर येथील नाग नदीचे पाण्याचा प्रवाह बदलविण्याची गरज आहे.
दूषित पाण्यावर भागते तहान
भंडारा शहरातील नागरिकांना पालिका प्रशासन याच वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी करते. अत्यंत घाण असलेले हे पाणी जलशुध्दीकरण यंत्रातून पुरवठा होत असला तरी, या यंत्रावरही शासंकता व्यक्त होत आहे. यासोबतच परिसरातील गावातही वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मासोळ्यांच्या प्रजोत्पादनांवर परिणाम
नाग नदीच्या दुषीत पाण्यामुळे वैनगंगा नदी विषाच्या विळख्यात सापडली आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने जनावरे हे पाणी पिवून मृत्यूच्या दाढेत जात आहे. मागील वर्षीपर्यंत या नदीतून मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन होत होते. यावर्षी नदी पूर्णपणे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली असून एक प्रकारचे विष पाण्यात कालवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नदी पात्रात मासोळ्यांचे जीवन संपुष्टात आले आहे. याचा परिणाम त्यांच्या प्रजोत्पादनावर पडला आहे.