शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST2021-04-22T04:36:24+5:302021-04-22T04:36:24+5:30
भंडारा : जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागाने वेळीच दखल घेऊन शासकीय तसेच अशासकीय खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला अदा करा
भंडारा : जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागाने वेळीच दखल घेऊन शासकीय तसेच अशासकीय खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या वेतन दर महिन्याच्या एक तारखेला अदा करण्याची मागणी महाराष्ट्र आहे. राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, देवेंद्र सोनटक्के, प्रवीण गजभिये, सचिन तिरपुडे यांनी केली आहे.
शासकीय तसेच अशासकीय खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक कर्मचारी हे सध्या कोरोना संक्रमणकाळ असला तरी शासन प्रशासनाच्या मागदर्शक सूचनांच्या अधीन राहून या भयावह वास्तव परिस्थितीतही विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ऑफलाइन तर कधी ऑनलाइन पद्धतीने अध्यापनाचे कार्य विश्वासपूर्वक इमानेइतबारे करीत आहेत, तसेच शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा आपले कार्य जबाबदारीपूर्वक पार पाडत आहेत. त्यामुळे सदर कार्यरत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणे ही शिक्षण विभागाची नैतिक जबाबदारी आहे; परंतु सदर वेतन एक तारखेला अदा करण्यात येत नसून ते विलंबाने अदा करण्यात येत असल्याची दस्तुरखुद्द शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओरड असून यामुळे कर्मचाऱ्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या जीवघेण्या आजाराने बाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा आजाराचा उपचार करण्यासाठी पैशाची नितांत गरज भासते; परंतु दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करण्यात येत नसल्याने सदर कर्मचारी आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. संकटसमयी औषधोपचार कसा करावा, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे, तरी संबंधित विभागाने कोणतीच पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्याचे वेतन अजूनपर्यंत अदा करण्यात आले नाही, अशी ओरड असूनही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला अदा न करण्याचे कारण काय? यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो त्याचे काय? यापुढे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करणार किंवा कसे? यास जबाबदार कोण? असा प्रश्न खेमराज कोंडे यांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागातील संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सहानुभूतीपूर्वक विचार करून भंडारा जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे खेमराज कोंडे, देवेंद्र सोनटक्के, प्रवीण गजभिये, सचिन तिरपुडे, मोहन बोंद्रे, सुरेश शेंडे, अशोक काणेकर, नाना गजभिये, विनोद नवदिवे, नदीम खान, अनाथपाल वैद्य, अजय वालदे, कल्याणी निखाडे, पी. जी. परिहार, आर. आर. काळे, धनंजय बोरकर, रिनाईत, सिंगनजुडे यांनी केली आहे.