निरोगी आयुष्यासाठी शरीराकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:17 IST2018-02-28T22:17:22+5:302018-02-28T22:17:22+5:30

निवृत्तीच्या वयात जीवन निरोगी राहण्यासाठी शरीराकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिेजे, असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश एस.जे. भट्टाचार्य यांनी केले.

Pay attention to the body for a healthy life | निरोगी आयुष्यासाठी शरीराकडे लक्ष द्या

निरोगी आयुष्यासाठी शरीराकडे लक्ष द्या

ठळक मुद्देएस.जे. भट्टाचार्य यांचे प्रतिपादन: ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमत
भंडारा : निवृत्तीच्या वयात जीवन निरोगी राहण्यासाठी शरीराकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिेजे, असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश एस.जे. भट्टाचार्य यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व कृतीशील निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संस्था, भंडारा जिल्हा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर जिल्हा न्यायालयात घेण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख होते.
शिबिराला जिल्हा न्यायाधीश-१ आर.पी. पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.पी. नायगावकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.जे. भट्टाचार्य, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.एम. धालीवाल, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.एच. राठी, चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.डी. मेंढे, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.ए. पटेल, न्यायालय व्यवस्थापक किशोर तलमले, पतंजली योग समितीचे रामविलास सारडा, कृतीशिल निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतराव लाखे, कृतीशिल निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्थेचे जिल्हाध्यक्ष माधवराव फसाटे, तसेच कृतीशिल निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संस्था भंडाराचे सदस्यगण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडाराचे जी.जी. कडव, वरिष्ठ लिपिक आर.एस. निमजे, कनिष्ठ लिपिक, मोरेश्वर नंदनवार, कनिष्ठ लिपिक, राजेश गोन्नाडे उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.पी. नायगावकर म्हणाले, आज ज्येष्ठ नागरिकांसाठी नालसाने एक कायदा केला आहे. त्या कायद्याच्या माध्यमातून आज त्यांना अधिकार दिलेले आहेत. आज न्यायालयामध्ये बहुतेक खटले भावाभावात भांडणातून उद्भवल्याचे दिसून येते, पण असे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले तर, ते दोषी आईवडीलांना मानत असतात. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हा न्यायाधीश - १ आर.पी. पांडे यांनी मानवी जीवनात आपल्या उत्तरार्धात आपल्याला कुणाची तरी गरज हवी असते. अशा वेळी आपल्याला कुणाचा आधार मिळाला नाही तर एकटेपणा जाणवते. पण आज जीवनात भांडणाचे प्रमाण वाढले व त्या माध्यमातून ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणजेच आज जी खटले समाजात होत आहेत. ती जास्तीत जास्त लोक अदालतच्या माध्यमातून सोडवावे.
पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष शरद नखाते यांनी आपल्या संघटनेबद्दल माहिती देवून आज आमची संघटना समाजात उत्तम कार्य करीत आहे. समाजातील काही अडचणी असतील तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून समर्थपणे सोडवितो असे त्यांनी सांगितले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी आरोग्याची निगा, योग, तसेच योग्य आहार घेण्याबाबत ज्येष्ठ नागरिकांना संबोधित केले. ज्येष्ठ नागरिकांनी जास्त ताणतणावात जीवन न जगता जीवनात सहजगता आणावी, अशा प्रकारची बरीच उदाहरणे त्यांच्या पुढे देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संचालन न्यायालय व्यवस्थापक किशोर तलमले भंडारा यांनी केले. आभार प्रदर्शन कृतीशिल निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संस्थेचे सचिव रत्नाकर तिडके यांनी केले.

Web Title: Pay attention to the body for a healthy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.