पवनीच्या युवकाने दिला परप्रांतियांना रोजगार
By Admin | Updated: March 23, 2016 00:46 IST2016-03-23T00:46:16+5:302016-03-23T00:46:16+5:30
होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

पवनीच्या युवकाने दिला परप्रांतियांना रोजगार
क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी : गाठ्या निर्मितीला वेग, १५ वर्षांपासून व्यवसाय सुरू
पवनी : होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. या वर्षी साखर महाग झाल्यामुळे गाठयाही महाग होणार आहेत. या वर्षी ८ ते १० टक्क्याने गाठ्या महागणार आहेत.
होळी व धूलिवंदन सणानिमित्त नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मित गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु आहे. ती आजही सुरु आहे. शहरातील घोडेघाट वार्डातील रवींद्र शिवरकर हे मागील १४ वर्षापासून गाठया निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांचे संपूर्ण कुटुंब मदत करतात.
गाठ्या निर्मितीकरिता मोठया पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठया भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घालून विवीध प्रकारच्या गाठयांची निमिर्ती केली जाते. या गाठया निर्मिती करण्याकरिता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते. या कारागीरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची जेवणाची व्यवस्था केली जाते. या कारागिरांना एक क्विंटल मागे ४०० रुपये मजूरी दिली जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठयांची निर्मीती केली जाते. याचे त्यांना ८०० रुपये मिळतात. एक क्विंटल साखरेच्या ९५ किलो गाठयांची निर्मीती होते. या गाठया २५, ५०, १००, २००, ५०० व १०० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.
रविंद्र शिवरकर यांनी २३ फेब्रुवारी गाठया निर्मीती सुरु केली आहे. या वर्षी जवळपास ७२ क्विंटल गाठ्यांची निर्मीती होण्याची अपेक्षा आहे. या गाठया भंडारा, लाखनी, भिवापूर, वडसा, उमरेड, ब्रम्हपूरी आदी शहरात पोहोचल्या आहेत. या व्यवसायात १० महिलांनाही रोजगार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)