प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी
By Admin | Updated: September 9, 2014 23:16 IST2014-09-09T23:16:14+5:302014-09-09T23:16:14+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ बाय ८ दर्जात मोडत असून या आरोग्य केंद्राला एकूण १७ गांवे जोडलेली आहेत. त्यामुळे दिघोरी व परीसरातील सर्व रुग्ण उपचारासाठी दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे

प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी
दिघोरी/मोठी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ बाय ८ दर्जात मोडत असून या आरोग्य केंद्राला एकूण १७ गांवे जोडलेली आहेत. त्यामुळे दिघोरी व परीसरातील सर्व रुग्ण उपचारासाठी दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाची खुप गर्दी होते. एकच वैद्यकिय अधिकारी असल्याने रुग्णांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते.
पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील सर्वच गावात विषाणुजन्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रुग्ण एकावेळी उपचारासाठी धाव घेतात. असे असतांना सुध्दा येथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना पुरेपुर सेवा देण्याचा भरपूर प्रयत्न करतात. एकाच वैद्यकिय अधिकाऱ्यावर संपुर्ण १७ गावांचा भार असल्यामुळे रुग्ण तपासणीला वेळ लागतो.
अशातच कुणी जास्त आजारी रुग्ण असल्यास डॉक्टरांना त्याला वेळ दयावा लागतो. त्यामुळे इतर बाह्यरुग्ण तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बराच काळ ताटकळत राहावे लागते. त्यासाठी अजून किमान एका वैद्यकिय अधिकाऱ्याची नेमणूक दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करावी अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.
याशिवाय येथील वैद्यकिय अधिकाऱ्याना विविध बैठकांना जावे लागते. आॅपरेशनच्या कॅम्प करावा लागतो त्यावेळी दवाखान्यात वैद्यकिय अधिकारी या नात्याने कुणीच उपस्थित नसतो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २५० ते ३०० च्या दरम्यान बाह्यरुग्ण तपासणी केली जाते यावरुन विषाणुजन्य आजारांची किती मोठ्या प्रमाणात परिसरात लागण झाली असेल याची प्रचिती येते.
शासनाने रुग्णांना वेळेवर व कमि खर्चात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मीती केली. मात्र दिघोरी/मोठी येथे एकच वैद्यकियअधिकारी असल्यामुळे रुग्णंना वेळेवर सेवा मिळू शकत नाही. याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालुन दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अजून एका वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी दिघोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)