पॅसेंजर रेल्वेअभावी प्रवाशांचे दिवाळीत हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST2021-11-07T05:00:00+5:302021-11-07T05:00:25+5:30
गतवर्षी कोरोना संसर्गामुळे बंद असलेली रेल्वे सेवा आता पुर्वपदावर येत आहे. परंतु पॅसेंजर रेल्वेबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. तर ज्या पॅसेंजर सुरु आहेत त्या वेळेमुळे प्रवाशांच्या सोयीच्या ठरत नाही. गतवर्षी २२ मार्च पासुन तुमसर-तिरोडी पॅसेंजर बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून ती सुरु झाली. परंतु वेळेमुळे ही गाडी आता प्रवाशांच्या सोयीची ठरत नाही. तुमसररोड रेल्वे स्थानकातुन ४.१५ वाजता ही पॅसेंजर सुटते आणि सकाळी ७ वाजता स्थानकात येते.

पॅसेंजर रेल्वेअभावी प्रवाशांचे दिवाळीत हाल
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संसर्गामुळे थांबलेले रेल्वेचे चाक रुळावर आले खरे. परंतु अद्यापही पुरेशा पॅसेंजर रेल्वे सुरुच झाल्या नाहीत. त्यामुळे दिवाळी आणि मंडईच्या पर्वात प्रवाशांचे हाल होत असुन आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील प्रवाशांना एसटी संपाचाही फटका बसत आहे.
गतवर्षी कोरोना संसर्गामुळे बंद असलेली रेल्वे सेवा आता पुर्वपदावर येत आहे. परंतु पॅसेंजर रेल्वेबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. तर ज्या पॅसेंजर सुरु आहेत त्या वेळेमुळे प्रवाशांच्या सोयीच्या ठरत नाही. गतवर्षी २२ मार्च पासुन तुमसर-तिरोडी पॅसेंजर बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून ती सुरु झाली. परंतु वेळेमुळे ही गाडी आता प्रवाशांच्या सोयीची ठरत नाही. तुमसररोड रेल्वे स्थानकातुन ४.१५ वाजता ही पॅसेंजर सुटते आणि सकाळी ७ वाजता स्थानकात येते. त्यामुळे प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. ही पॅसेंजर सकाळी १० वाजता सोडण्यात आली तर प्रवाशांच्या सोयीचे होऊ शकते.
दिवाळी आणि मंडईसाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नातेवाईक एकमेकांकडे ये - जा करतात. परंतु पॅसेंजर गाड्या बंद असल्याचा फटका त्यांना बसत आहे. नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. उलट शेजारच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मात्र रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे पुर्व विदर्भात दिवाळीनंतर सुरु असलेल्या मंडई सणाला जाणे-येणे कठीण होत आहे. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरु करावी अशी मागणी आहे.
एसटी संपाचा फटका
- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळीत संप सुरु असल्याने आंतरराज्य बससेवा ठप्प आहे. याचा फटका दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसत आहे.