कीडनाशक फवारणीमुळे धानपीक वाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 00:30 IST2016-10-11T00:30:27+5:302016-10-11T00:30:27+5:30
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून दररोज पाऊस पडत असल्याने ..

कीडनाशक फवारणीमुळे धानपीक वाळले
पाऊस पिच्छा सोडेना : अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून दररोज पाऊस पडत असल्याने हलक्या धानाचे पीक मातीमोल होत आहेत. अशातच शेतकऱ्यांनी धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रार्दुभाव झाल्यामुळे कोसरा (कोंढा) येथील लक्ष्मी अॅग्रो एजन्सीतून सानवॉस कंपनीचे औषधी घेऊ न फवारणी केली असता शेतकऱ्यांचे उभे पीक वाळले. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
शेतकरी चौरास भागात धानाचे पिक वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत आहे. पण निसर्गासोबत मानवी चुकामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक जात आहे. कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी धानपिकावर तुडतुडा किडीचा प्रार्दुभाव वाढल्याने लक्ष्मी अॅग्रो एंजन्सी कोसरा येथून सानवॉस औषध दुकानदाराच्या सल्ल्यानुसार घेतले. सदर औषधी शेतात स्प्रे पंपाद्वारे फवारणी केली असता धान पिक रोगमुक्त होण्याऐवजी वाळून गेले आहे.
या किडनाशक औषधाची धान पिकावर रिअॅक्शन झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान वाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव येथील श्रीधर येळणे यांच्या चार एकरातील धानपीक वाळल्याने २ लाख रूपयाचे नुकसान झाले. धनराज मोहरकर, रा. पिंपळगाव, मारोती जिभकाटे रा.कोंढा या शेतकऱ्यांचे धान या औषधीने वाळले. याशिवाय औषधी फवारणीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
भंडारा/पालांदूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने अजुनही पिच्छा सोडलेला नाही. शेकडो एकरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. पावसामुळे हलके धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी याचे सर्वेक्षण झालेले नाही. परंतु याची आकडेवारी कोट्यवधी घरात आहे. कालपासुन जिल्ह्यात वरूणराजाने दमदार हजेरी लावली. पालांदूर परिसरात मुसळधार पावसामुळे धान जमीनदोस्त झाले आहे. हलक्या धानाची नासाडी झाली आहे.
नुकसानीचा आकडा सर्वेक्षणअभावी प्राप्त होऊ शकला नाही तरी उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने घोषीत केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे काढली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिना उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. परतीच्या पावसाने सुरुवात केली. हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे.कापलेल्या धानाच्या कडपामध्ये पाणी शिरले आहे. या कडपांमधून वास येत असून बळीराजाचे टेंशन वाढले आहे. धान कमी पण निंदण जास्त अशी स्थिती सप्टेंबर महिन्याच्या पहिला व दुसऱ्या हप्त्यात होती. ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुडतुडा, लष्करी अळी, करपा या रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
(प्रतिनिधी/वार्ताहर)
औषधी डिफॉल्ट असल्याचे वाटत आहे. यासंबंधात पिकांचे सँपल काढून प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.
-ए. डी. गजभिये, तालुका कृषी अधिकारी, पवनी.
पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र साकोली, येथील वैज्ञानिकांची चमू पिकांचे निरीक्षण करुन अहवाल तयार करतील कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात येईल.
- बी.एन.मेहर, कृषी विस्तार अधिकारी, पवनी
सानवॅस कंपनीचा डीलर आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर औषधाची विक्री बंद केली आहे. शेतकऱ्यांला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यास पूर्णपणे मदत करणार आहे.
- पी.पी. लांजेवार, संचालक लक्ष्मी अॅग्रो एजन्सी, कोसरा.