शेतकऱ्यांच्या श्रमदानातून पांदण रस्ता
By Admin | Updated: February 2, 2016 00:31 IST2016-02-02T00:31:26+5:302016-02-02T00:31:26+5:30
शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने लगतच्या शेतकऱ्यांनी शेतीची जागा दान दिली.

शेतकऱ्यांच्या श्रमदानातून पांदण रस्ता
१३०० मीटर रस्ता : २७७ मजुरांना काम, शेतकऱ्यांनी दिली रस्त्यांसाठी जमीन दान
पालांदूर (चौ.) : शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने लगतच्या शेतकऱ्यांनी शेतीची जागा दान दिली. यावर रस्त्याचे काम करण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.
१३०० मीटरच्या रस्त्याला १५ शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालकीची जागा दिल्याने शेकडो शेतकऱ्यांची सुविधा झाली आहे. पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा घटक आहे, असाच कित्येक वर्षापासून दुर्लक्षित ढिवरखेडा गावात पांदण रस्ता विजनवासात गेल्यासारखा असताना शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालकीची जागा देत पांदण रस्ता निर्मितीला हिरवा मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गाची व्यवस्था होऊ शकली आहे.
कामावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण असून सरपंच गजानन शिवणकर, उपसरपंच भास्कर हत्तीमारे, रोजगारसेवक हिवराज शहारे यांनी पुढाकार घेत २७७ मजुरांच्या सहकार्यातून ४० दिवसात हे काम पूर्ण केले.
या रस्त्याची रूंदी ३.४० मीटर असून प्रथम टप्प्यात मातीकाम होत आहे. पुढच्या टप्प्यात तीन सीडीवर्क व मुरूम कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या पांदण रस्त्याला बारमाई वहिवाट होत असून बागायती शेती व विटभट्टी व्यवसाय या मार्गावर चालतो. रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोजच्या त्रासातून कायम स्वरूपाची सुटका झाली हे विशेष. या रस्त्यावर ग्रामपंचायत गोंदी, ढिवरखेडा येथील मजूर कामावर असून मग्रारोहचे उद्दिष्ट सफल होत आहे. (वार्ताहर)