आधारभूत धान खरेदी केंद्राने दिला दगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 00:44 IST2016-01-24T00:44:57+5:302016-01-24T00:44:57+5:30
येथे लक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचे असे दोन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.

आधारभूत धान खरेदी केंद्राने दिला दगा
दिघोरी येथील प्रकार : बोनसबाबत शेतकरी संभ्रमात, शेतकरी हवालदिल, ३.३० कोटीपैकी केवळ एक कोटींचे वितरण
दिघोरी (मोठी) : येथे लक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचे असे दोन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या दोन्ही धान खरेदी केंद्रावर जवळपास पावणे तीन कोटी रुपये किमतीचे धान शेतकऱ्यांनी दिली. मात्र आजपावेतो केवळ १ कोटी रुपयांचेच चुकारे मिळाले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधार देण्याऐवजी धान खरेदी केंद्राने दगा दिला असल्याची भावना आज शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.
यापूर्वी निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमेल तशी जुळवाजुळव करून शेतीला पाणी व रोगांना किडनाशक औषध फवारणी केली. या संकटातून पिकाला कसेबसे वाचविले. हातात पैसा नाही. उसवणार, व्यवहार, मुलीचे लग्न, दुकानदारांची उधारी इत्यादी चक्रव्युहात शेतकरी सापडला असून धान खरेदी केंद्रावर धान विकून १ महिन्याचेवर कालावधी लोटला असला तरी अजूनपर्यंत धानाचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर केला. मात्र धान खरेदी केंद्रावर धान दिल्याच्या रुपयांच्या पावतीवर बोनसचे रुपये जोडलेले नसल्याने बोनसचे रुपये मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्या धानाला खासगी व्यापाऱ्याचे १,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता तेही धान शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत १,४१० व २०० रु. बोनस असे मिळणार म्हणून धान खरेदी केंद्रावरच दिल्याने जर बोनस मिळाला नाही, तर १०० रुपये प्रतिक्विंटल आपले नुकसान तर होणार नाही ना, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या खरेदी केंद्रावर ९,६२७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून याचे एकूण रुपये १ कोटी ३६ लाख रुपये होतात आणि बोनसचे २० लाख रुपये, असे एकूण १ कोटी ५६ लाख रुपयांपैकी केवळ ४७ लाख रुपयांचे चुकारे या खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलीत. उर्वरीत १ कोटी ११ लाख रुपयाचे चुकारे अजूनही प्रलंबित आहेत. तसेच खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये १०,७८२ क्विंटल धानाची खरेदी झाली असून १,४१० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे १ कोटी ५२ लाख रुपये होतात आणि बोनसचे २२ लाख, असे एकूण १ कोटी ७४ लाख रुपयांची खरेदी या केंद्रावर झाली. त्यापैकी केवळ ७१ लाख रुपयांचेच चुकारे वाटप झाले. उर्वरीत १ कोटी ३ लाख रुपयाचे चुकारे अडले आहेत.
दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचे धान शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आले. यापैकी १ कोटी १८ लाख रुपयाचेच चुकारे मिळाले आहे. महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे २ कोटी १२ लक्ष रुपये शासनाकडे बाकी आहेत. हे रुपये केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.
शासन कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला न चुकता वेळेवर देतो. मग शेतकऱ्यांचे हक्काचे रुपये देण्यास टाळाटाळ का करतो? शेतकऱ्यांनाही परिवार आहे. त्यांनाही कर्मचाऱ्यांसारखी पैशाची गरज भासते, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)
सरांडीतील धान खरेदी केंद्र बंद
विरली (बु.) : सरांडी (बु.) येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर पुरेशा प्रमाणात बारदाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे हे केंद्र वारंवार बंद ठेवावे लागते. परिणामी येथील धान खरेदी प्रक्रिया रखडली असून दिड महिन्यांपासून शेकडो शेतकऱ्यांचे हजारो पोती धान उघड्यावर पडून आहेत.
दि सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था लाखांदूरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या या धान खरेदी केंद्रावर २२ जानेवारीपर्यंत २९५ शेतकऱ्यांच्या १३,६८७.६० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाची किंमत १ कोटी ९२ लाख ९९,५१६ रुपये आहे. या केंद्रावरून १८ डिसेंबरपर्यंत खरेदी केलेल्या धानाचे ७१ लाख ९३,६०० रुपयांचे चुकारे वाटप करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रावर केंद्र चालकांच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात बारदाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे या केंद्रावरील धान खरेदी वारंवार बंद ठेवावी लागते. परिणामी या खरेदी केंद्राच्या पटांगणात शेकडो शेतकऱ्यांचे सुमारे ५ हजार पोते धान उघड्यावर पडून आहेत. तर काही शेतकरी नाईलाजाने आपले धान खासगी व्यापाऱ्यांना विकत आहेत.
आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आमचे सर्वच लहान मोठे लोकप्रतिनिधी शासकीय धान खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांनी आपले धान विकावे, असे आवाहन करतात. मात्र शासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे या केंदयावर बारदाण्याअभावी शेतकऱ्याना आपल्या धानाच्या काट्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
त्याचप्रमाणे दर आठवड्यालाच बारदाण्याअभावी हे केंद्र बंद ठेवण्याची पाळी येत असल्याने या केंद्रावरील हमालही वैतागले असून काम सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तरी संबंधित यंत्रणेने याकडे जातीने लक्ष घालून या केंद्रावर बारदाण्याचा पुरवठा करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)