पावसाच्या लहरीपणावर तरूण शेतकऱ्याची मात
By Admin | Updated: August 20, 2014 23:21 IST2014-08-20T23:21:07+5:302014-08-20T23:21:07+5:30
मृग नक्षत्राची चाहूल लागताच बहुतांश शेतकऱ्यांनी धानशेतीवर भर दिला. कर्ज काढून शेतात ताकद खर्ची घातली. पैसा संपला आणि पावसानेही दडी मारली. यामुळे पेरणी उगवण्यापूर्वीच जमिनीतच

पावसाच्या लहरीपणावर तरूण शेतकऱ्याची मात
तरीही कपाशी पाच फुट : खापरीच्या शेतकऱ्याचा हायटेक प्रयोग
शरद देवाडे - भुयार
मृग नक्षत्राची चाहूल लागताच बहुतांश शेतकऱ्यांनी धानशेतीवर भर दिला. कर्ज काढून शेतात ताकद खर्ची घातली. पैसा संपला आणि पावसानेही दडी मारली. यामुळे पेरणी उगवण्यापूर्वीच जमिनीतच गडप झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. अशा परिस्थितीत खापरी (भुयार) येथील एका तरूण शेतकऱ्याने जिद्दीने कपाशी पेरली. सध्या हे शेत हिरवकंच असून पाच फूट उंचीच्या कपाशीला बोंड लागलेली आहेत.
किशोर सुर्यभान वराडे असे या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या हायटेक शेतीचा मंत्र जोपासणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलोपार्जित त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. शिक्षण सुरू असतानाच त्याच्या वडिलाची प्रकृती बिघडली. त्यातच किशोरचे पदव्युत्तर शिक्षण झाले. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्याने २५ व्या वर्षापासून शेती व्यवसाय सुरू केला.
२५ एकर शेतीत त्याने १५ एकरात कपाशी, २ एकरात वांगे, दोन एकरात टमाटर, १ एकरात भेंडी, अर्धा-अर्धा एकरात चवळी, मिरची, काकडी पिकाची लागवड केली. त्याचे भरघोस उत्पादन झाले. पिकाची बाजारात विक्रीही सुरू केली. ठिंबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी व किटकनाशके दिले जाते. त्यांच्या शेतात दररोज १५ ते २० मजूर काम करतात. एका पिकानंतर दुसरे पीक घेण्यात येत आहे.
कपाशी पाच फूट
जिथे दूरदूरपर्यंत सोयाबीन आणि कापशीचे पीक दिसत नाही, त्याच परिसरात किशोरने कापसाची लागवड केली. आता त्याच्या पाच फुट उंचीचे कपाशीचे पीक डोलत असून त्याला बोंड लागलेली आहेत. मागीलवर्षीच्या उत्पन्नापेक्षाही यावर्षी अधिक उत्पादनाची आशा आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने शेती केली तर भरघोस पीक घेता येत असल्याचे सांगितले.
शेतीतून आनंद शोधतो
प्रारंभी खूप मेहनत घेऊनही हातात फारसे काही लागत नव्हते. चटके सोसूनही पदरात निराशाच पडत होती. अशा परिस्थितीत खचून न जाता शेती कसायची असा निर्धार केला. त्यानंतर शेतीकडे बघण्याची दृष्टी बदलविली. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक मग शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी का? होऊ नये. त्यासाठी का धडपड करू नये, या प्रश्नाने अस्वस्थ केले.
शिक्षणामुळे शेतीत सोने पिकवू शकतो, यावर किशोरचा विश्वास होता. त्यामुळे त्याने कर्ज काढून शेतात ठिंबक सिंचनासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री बसविली. त्या माध्यमातून पाणी आणि खताचे नियोजन केले. शेतीत जीव ओतला. आता शेती फळाला आली आहे. त्यामुळे शेतीत एन्जॉय करीत असल्याची प्रतिक्रिया किशोर वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.