सेल्फी व डेली अटेन्डन्सला शिक्षकांचा विरोध
By Admin | Updated: January 10, 2017 00:39 IST2017-01-10T00:39:22+5:302017-01-10T00:39:22+5:30
बोगस विद्यार्थी संख्या दाखवून अनेक शाळांमध्ये शासनाचे अनुदान लाटण्यात येते.

सेल्फी व डेली अटेन्डन्सला शिक्षकांचा विरोध
शिक्षक कृती समितीचा निर्णय : मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : बोगस विद्यार्थी संख्या दाखवून अनेक शाळांमध्ये शासनाचे अनुदान लाटण्यात येते. यावर आळा बसावा व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून त्यांची हजेरी घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने राज्यात ‘सेल्फी, डेली अटेन्डन्स’ची अंमलबजावणी केली. मात्र यामुळे शिक्षकांना याचा अतिरिक्त त्रास होत असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी याला विरोध केला असून त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक कृती समितीच्या वतीने हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. याबाबत त्यांनी आज सोमवारला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अभयसिंह परिहार यांना निवेदन दिले. यात सेल्फीवर बहिष्कार टाकीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षण प्रशासन व शिक्षक आता सेल्फीवरून आमोरेसामोरे उभे ठाकले आहेत.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०१६ ला सेल्फी काढण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०१७ पासून करण्याचे सुतोवाच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. सर्व शाळातील विद्यार्थ्यांची वर्गनिहाय सेल्फी काढून ती सरलवर पाठविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिलेल्या आहेत. अगोदरच शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कामांचा बोझा शिक्षकांवर असल्याने या अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांचे विद्यादानाकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी घडविताना शिक्षकांना या कामातून मोकळे करावे व सेल्फीचा घेतलेला राज्य शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी जिल्ह्यातील शिक्षक कृती समितीने सेल्फी व हजेरीपट यावर बहिष्कार घातला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून अगोदरच शाळांची सरल, एमडीएम, शिष्यवृत्ती, आधारकार्ड यासह अन्य शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना सहभागी करून घेतात. शाळांच्या विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती आता शिक्षण विभागाने संगणकीकृत पद्धतीने भरण्याची अंमलबजावणी केली असल्याने शिक्षकांसाठी ती डोकेदुखी ठरू पाहत आहे.
अशात सेल्फी व रोजनिशी पटसंख्येची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत. तर अनेक शाळांमध्ये विद्युत जोडणी नसल्याने ही प्रक्रिया राबविताना अडचणी निर्माण होत आहेत. याखेरीज अध्यापनाचा अमुल्य वेळ वाया जात असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर फरक पडणार आहे. आॅनलाईन हजेरी व सेल्फीसारखे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आॅनलाईन माहिती भरणे व सेल्फी काढण्याच्या निर्णयावर राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाविरुद्ध बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी शिष्टमंडळात शिक्षक कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, युवराज वंजारी, ईश्वर ढेंगे, वसंत साठवणे, सुधीर वाघमारे, महेश गावंडे, मुकुंद ठवकर, संदीप वहिले आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)