एका वीज खांबासाठी हजार तर डीपीसाठी चार हजारांचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:46+5:302021-08-25T04:39:46+5:30
अड्याळ येथील मासिक सभेत ठराव पारित : तर वीज वितरणवर दोन कोटींची थकबाकी अड्याळ : एरव्ही वीज वितरण कंपनी ...

एका वीज खांबासाठी हजार तर डीपीसाठी चार हजारांचा कर
अड्याळ येथील मासिक सभेत ठराव पारित : तर वीज वितरणवर दोन कोटींची थकबाकी
अड्याळ : एरव्ही वीज वितरण कंपनी गावातील पथदिव्यांच्या बिलाची आकारणी करून ती रक्कम वसूलही करीत असते. मात्र आता पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीने एक ठराव संमत केला आहे. त्यात गावात असलेल्या प्रत्येकी वीज खांबासाठी एक हजार रुपये तर विद्युत डीपीसाठी चार हजार रुपयांचा कर आकारला जाणार आहे. या आशयाचा ठराव मासिक सभेत मंजूर करण्यात आला असून या नियमाप्रमाणे गत २० वर्षात दोन कोटी रुपयांच्या घरात वीज वितरण कंपनीवर थकबाकी काढण्यात आली आहे. अड्याळ ग्रामपंचायतीच्या या निर्णयाने सर्व अचंबित असले तरी अंमलबजावणी करण्यात येणार आहे
अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाचे विद्युत विभागावर दोन दशकानुसार २ कोटी रूपयांच्या घरात थकबाकी निघत आहे. याची माहिती अड्याळ येथील सहाय्यक अभियंता मार्फत विद्युत विभागाला सादरही केली आहे. त्यात अड्याळ ग्रामपंचायत हद्दीत विद्युत विभागाने घातलेले विद्युत खांब तथा डीपी यावर क्रमानुसार हजार व चार हजार असा कर आकारण्यात आला आहे. करापोटी एवढी रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्यास गाव विकासात त्याची भर पडणार आहे
या निर्णयाने अड्याळ ग्रामपंचायत पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. असा ठराव संमत करणारी अड्याळ ग्रामपंचायत राज्यात दुसरी ठरली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला आहे. गावागावात असणारे पथदिवे हे विद्युत विभागाने एक एक करून बंद केले. त्यामागील कारण विद्युत बिल ग्रामपंचायतने भरले नसल्याने गावातील पथदिव्यांची विद्युत तथा पाणीपुरवठा योजनेची विद्युत कपात करण्यात आली होती. आता ते बिल आधीसारखे जिल्हा परिषद मार्फत भरले जाणार नसून ग्रामपंचायत प्रशासनालाच भरावे लागणार आहे. जेव्हा वीज वितरण कंपनी जर आपली रक्कम बरोबर घेत असेल तर ग्रामपंचायतीने कराची रक्कम का म्हणून सोडायची, अशी चर्चा सुरू आहे.
अड्याळ येथे गेली २० वर्षे पासून वीज वितरण कंपनीने गावात तथा शेतजमिनीत वीज कनेक्शन दिले, हाय पाॅवर मनोरा उभारणी केली. यासाठी गावातील जमिनीचा वापर केला आणि आजही करीत आहे. हे सर्व करताना ग्रामपंचायतीची परवानगी नाही. आणि असेल तर कागदपत्रे सादर करावेत किंवा आकारलेला कर भरावा असे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोट
विद्युत विभागावर जितकी टॅक्स स्वरूपातील रक्कम बाकी आहे त्यांनी ती भरावी.
-जयश्री कुंभलकर, सरपंच अड्याळ