एक लाख हेक्टर धान किडीच्या कवेत
By Admin | Updated: October 7, 2015 01:45 IST2015-10-07T01:45:56+5:302015-10-07T01:45:56+5:30
धान पिकावर दरवर्षी कीड येत असली तरी यावर्षी या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. भंडारा जिल्ह्यात धानाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के ....

एक लाख हेक्टर धान किडीच्या कवेत
इंद्रपाल कटकवार भंडारा
धान पिकावर दरवर्षी कीड येत असली तरी यावर्षी या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. भंडारा जिल्ह्यात धानाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के म्हणजे १ लाख हेक्टरमध्ये किडीने आक्रमण केले आहे. परिणामी यावर्षी अधिक उत्पादनाची आशा धुुसर झाली आहे. सरासरी होणाऱ्या उत्पादनामध्ये १८ ते २० टक्के उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक धान आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात १.८० लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात सर्व पिकांची लागवडीची एकूण टक्केवारी ९८ टक्के इतकी आहे. पावसाचा लहरीपणा, वाढते उष्णतामान आणि ऐन धान कापणीच्या पूर्वी लोंबीमध्ये असलेल्या धानावर किडीने हल्ला केला आहे. धानाच्या बुंद्यावर असलेली किड हळूहळू पसरत लोंबीतील दाणा कुरतडत आहे. परिणामी याचा सरळ फटका उत्पादनावर होणार असल्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
राष्ट्रीय बँका, जिल्हा बँक, पतसंस्थांचे कर्ज आणि कुटुंबाची जबाबदारी अशा ओझ्याखाली सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर किडीने पाणी फेरले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांना वगळल्यास आकाशाकडे डोळे लावून असलेल्या शेतकऱ्यांना ‘एका पाण्यासाठी हातचे पीक जाणार’ या भीतीने शेतकरी धास्तावलेला आहे.
दुसरीकडे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुदानावर देण्यात येणाऱ्या औषधींचा पुरवठा अत्यल्प आहे. अशा स्थितीत बळीराजा दोन्ही बाजुने भरडला जात आहे. यास्थितीत भात पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रात जड धान तर उर्वरीत क्षेत्रात हलके धान आहे. त्यातही किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव हलक्या धानावर आहे. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल आणि पीक होईल, अशी आशा होती, परंतु यावर्षीही पावसाने दगा दिल्यामुळे लागवड खर्चही निघण्याची स्थिती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
गादमाशी, कडाकरपा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव
धान पिकावर तपकिरी, पांढऱ्या पाठिचे व हिरव्या रंगाच्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आहे. धान पिक कापणीच्या हंगामात गादमाशी, कडाकरपा, खोडकिडा, बेरकी, पर्णकोष आदी किड व रोगांचा परिणाम दिसून येत आहे. रोपांची दाट वाढ असलेल्या ठिकाणी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये विखुरलेल्या स्थितीत या किडीचा प्रादुर्भाव आहे. ही किड धान पिकातील रस शोषून घेत असल्याने धानाची लोंबी कमजोर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. महागडी औषध फवारणी करूनही पाण्याचा अभाव व वाढत्या उष्णतेमुळे उपाय नगण्य ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी काही भागात ढगाळ वातावरण असल्याने रोगराईला अधिक बळ मिळाले आहे. परिणामी शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
मागणी लाखांची पुरवठा अत्यल्प
जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयामार्फत दरवर्षी किटकनाशकांची मागणी केली जाते. यावेळी मागणी करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील धानपिकाच्या एकूण क्षेत्रापैकी केवय १८० हेक्टर क्षेत्राकरिता औषधे मिळाली. यात अर्धा लिटर याप्रमाणे १९ हजार ८३४ पाऊच तालुका कृषी कार्यालयांना वितरीत करण्यात आले. यात अन्न सुरक्षा योजना व क्रॉप सॅप अंतर्गत देण्यात आले. विशेष म्हणजे यातील क्रॉप सॅप योजनेची औषध केवळ ‘हॉली अफेक्टेड’ क्षेत्रासाठी उपलद्ध करून देण्यात येते. पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धानपिक घेतले जात असताना औषधांची ही मात्रा अत्यंत अल्प आहे. या औषधांमध्ये कॉपर आॅक्सीक्लोराईड, क्विनोलफॉस, मोनोक्रोटोफास आदी औषधांचा समावेश आहे.
धान पिकावर आॅगस्ट महिन्यापासूनच किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रकार बारीक वाणावर अधिक प्रमाणात आहे.कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, पर्णकोष यासारख्या रोगामुळे धानाच्या लोंबीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. पी. आर. शामकुंवर, धान परिक्षण केंद्रप्रमुख, कृषी विज्ञान केंद्र साकोली
धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव आहे. जिल्ह्यात केलेल्या पाहणीत धानावर गादमाशी, कडाकरपा, खोडकिडा आदी रोग व किड दिसून आली. किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभाग सर्वतोपरी शेतकऱ्यांना मार्ग़दर्शन करीत आहे. सद्यस्थितीत सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी धानाला पाण्याची गरज आहे. ज्याठिकाणी किडीचा अधिक प्रादुर्भाव आहे त्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी युरीयाची फवारणी करावी.
- डॉ.नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.