अरे.... काही तर सांगा आम्हाला; कंपनीत काम करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव रडकुंडीला
By नरेश डोंगरे | Updated: January 24, 2025 22:38 IST2025-01-24T22:25:58+5:302025-01-24T22:38:03+5:30
पोलीस, सुरक्षा रक्षकांसमोर केविलवाणा आग्रह, ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली.

अरे.... काही तर सांगा आम्हाला; कंपनीत काम करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव रडकुंडीला
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एवढी भयानक घटना घडून पाच तास झाले. तुम्ही आम्हाला अंदरही जाऊ देत नाही आणि आत मध्ये काय झाले, काय नाही, ते सांगतही नाही. आम्ही कसे करायचे, असा केविलवाना प्रश्न भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक बाहेर उपस्थितांसमोर करीत होते.
ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली. त्यामुळे या फॅक्टरीत काम करणाऱ्या नातेवाईकांच्या हृदयाची धडधड वाढली. ते मिळेल त्या साधनाने फॅक्टरी परिसरात आले. तोपर्यंत फॅक्टरीच्या इस्पितळात एकाचा मृतदेह आणण्यात आला होता. अन्य जखमींना खाजगी इस्पितळात हलविण्यात आले होते. तर इमारतीच्या मलब्यामध्ये अनेक जण दबून असल्याचे वृत्त बाहेर सांगितले जात होते. त्यामुळे आतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या जीवाची घालमेल वाढली होती.
कर्मचाऱ्यांना आत मध्ये मोबाईल नेण्यास मनाई होती. दुपारचे साडेतीन वाजले तरी आत मध्ये कोण दबून आहेत आणि कोण सुखरूप आहेत, त्याबद्दलची कसलीही माहिती बाहेर आली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांचा जीव अक्षरशः रडकुंडीला आला होता. कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाचा मुलगा, तर कुणाचा भाऊ फॅक्टरीच्या आत असल्याने तो कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी हे बिचारे नातेवाईक केविलवाणी धडपड करत होते. अनेकदा त्यांनी फॅक्टरीच्या आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्यांना तिथेच थोपवून धरल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला. त्यांनी सुरक्षारक्षक व पोलिसांसमोर आमच्या नातेवाईकाचे आत हाल कसे आहे, ते आम्हाला सांगा असा आग्रह धरला.
पोलीस, सुरक्षा रक्षकही हतबल
सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस तसेच सुरक्षा रक्षकही हतबल होते. त्यांना कसलीही माहिती नव्हती. आतमध्ये बचाव कार्य सुरू आहे, एवढेच त्यांना ठाऊक होते. जखमी किंवा मृता बद्दल कसलीही माहिती नसल्याने संतप्त नातेवाईकांची समजूत घालता घालता, त्यांचीही अवस्था वाईट झाली होती.
अन त्या माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटला
किरण नामक तरुण फॅक्टरीत कामाला होता. प्रमोशनमुळे त्याने नवीन पदाची जबाबदारी नुकतीच घेतली होती आणि आजच अशी घटना घडल्याने त्याची आई तसेच नातेवाईक धावत पळत फॅक्टरी परिसरात पोहोचले. किरण कुठे आहे, कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या धडपडत होत्या. अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वर आत मधून एक फोन आला. प्रत्यक्ष किरणं बोलला आई, मी सुखरूप आहे, चिंता करू नको, हे ऐकताच त्याच्या आईच्या भावनांचा बांध फुटला. त्या हमसून हमसून रडू लागल्या.
अनेकांच्या भावनांचा कोंडमारा
अनेक नातेवाईकांच्या भावनांचा कोंडमारा झाला होता. आतमध्ये असलेले आपले नातेवाईक कसे आहे, ते त्यांना तब्बल पाच तासानंतर कळाले. तोपर्यंत अनेक नातेवाईक हवालदिल होते.