-आता समाधानकारक पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 15, 2015 00:34 IST2015-06-15T00:34:51+5:302015-06-15T00:34:51+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे.

-आता समाधानकारक पावसाची प्रतीक्षा
बियाण्यांची जुळवाजुळव : संकट पाठ सोडायला तयारच नाही
भंडारा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. शेतामध्ये शेणखते पसरविण्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे धरणी हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून येते. बळीराजा आता बियाण्यांची कशीबशी जुळवाजुळव करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र दमदार पाऊस न कोसळल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी पेरणीकरिता सध्या कोणतीही ‘रिस्क’ न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्याकडील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून असून निसर्गाचा पाऊस लहरी आहे, हे चित्र पुन्हा सध्या तरी दिसत आहे. मात्र या लहरी पावसावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. मागील वर्षीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. दुबार, तिबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून शेतकरी सतर्क आहे. समाधानकारक पावसाची आता शेतकरी वाट बघत आहे.
मागील काही महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून घरावरील छते व टिनपत्रे उडविली. वीज पुरवठाही खंडित झाला होता. अशा अनेक संकटांना तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. एप्रिल व मे महिन्यात बळीराजाने लगीनसराईची कामे उरकवून घेतली. मात्र अद्यापही मान्सूनचा पाऊस आलाच नाही.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. यंदाही जादा दराने बियाणे व खताची विक्री, मुदतबाह्य बियाणांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. दुबार, तिबार पेरणीचा फटका बसू नये म्हणून पेरणीकरिता बळीराजा विचारपूर्वक पाऊल टाकत आहे.
शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा भार पेलतानाच खरीप हंगामाच्या बियाण्यांची जुळवाजुळव करताना उसणवारी करून कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही.
मात्र नापिकी आणि कर्जाने शेतकरी होरपळला असताना पुढील शेतीच्या हंगामाकरिता पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
गेल्या हंगामात निसर्गाने दगा दिला. तरी पुन्हा नव्या जोमाने हिरवे स्वप्न उराशी बाळगून बळीराजा जोमाने शेती कामाकडे वळत आहे. (प्रतिनिधी)
आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक
संकट बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. मात्र निसर्ग साथ देईल आणि शेती पिकवून कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेच्या बळावर रखरखत्या उन्हात बळीराजा शेतीची मशागत करीत आहे. बियाण्यांची जुळवाजुळव आणि शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. शेती हा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर असल्याने शेतीसाठी पैसा जुळवताना शेतक-यांच्या नाकीनऊ येत आहे.