आता वणव्यावर ‘सॅटेलाईट’ची नजर

By Admin | Updated: April 10, 2015 00:40 IST2015-04-10T00:40:11+5:302015-04-10T00:40:11+5:30

फेब्रुवारी, मार्चपासून जंगलात वणव्यांचा हंगाम सुरु होतो. मात्र आता वणव्यांवर ‘सॅटेलाईट’ची नजर राहणार आहे.

Now the look of satellite on the wallet | आता वणव्यावर ‘सॅटेलाईट’ची नजर

आता वणव्यावर ‘सॅटेलाईट’ची नजर

भंडारा : फेब्रुवारी, मार्चपासून जंगलात वणव्यांचा हंगाम सुरु होतो. मात्र आता वणव्यांवर ‘सॅटेलाईट’ची नजर राहणार आहे. यंदा उन्हाळ्यात पाऊस बरसल्याने आगीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. ही बाब वन्यप्राण्यांना दिलासा देणारी आहे.
उन्हाळा सुरु झाला की, व्याघ्र प्रकल्पांत वन्यप्राण्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही भागात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलाला आगी लावण्याचे प्रकार घडतात. हा प्रकार रोखण्यासाठी डेहराडून येथील संस्थेकडून राज्यातील वणव्यांवर सॅटेलाईटने पाळत ठेवली जात आहे. वणव्याची स्थिती लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पात आगी लावून वन्यप्राण्यांची शिकार करणे हा शिकाऱ्यांचा उद्देश असतो. या प्रकाराला आळा घालण्याकरिता आग लागल्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र, बक्षीस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
एखाद्या वनक्षेत्रात आग लागल्यास ही माहिती डेहराडून येथील संस्थेला उपग्रहाच्या माध्यमातून पाठविली जाते. त्यानंतर कोणत्या वनक्षेत्रात आग लागली, हे लगेच वनअधिकाऱ्यांना कळविले जाते. राज्यात कोणत्या वनक्षेत्रात आग लागली ही माहिती क्षणात सर्वदूर पसरत असल्याने वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. या नव्या ‘सॅटेलाईट’ उपक्रमाचा धसका वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतला असून यामुळे आगीच्या घटना रोखण्यात यश मिळणार आहे. उन्हाळा सुरु होऊन दोन महिने झाले असताना विदर्भात कोठेही वणवा पसरल्याची घटना निदर्शनास आलेली नाही.
यापूर्वी उन्हाळा सुरू झाला की, शिकारी जंगलाला आगी लावून वन्यप्राण्यांची हत्या घडवून आणायचे. मात्र, ‘सॅटेलाईट’ या प्रणालीने व्याघ्र प्रकल्पात आगी लागण्याच्या घटना नगण्य झाल्या आहेत. प्रत्येक वनवृत्तात १० ते १२ मीटर अंतरावर जाळरेषा तयार करण्यात आली आहे. फायर टॉवर उभारण्यात आले आहे.
बिनतारी संदेश यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जंगलालगत असलेल्या गावांतील नागरिकांना खबरे म्हणून भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्याकरिता त्यांना विशेष मानधनदेखील दिले जात आहे.
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ५ ते १० कि.मी.पर्यंत जाळरेषा तयार करुन आगीवर नियंत्रण मिळविले गेले आहे. मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर अभयारण्यातही वणव्यावर कटाक्ष ठेवला जात आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Now the look of satellite on the wallet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.