पाणीटंचाई निर्माण होऊ देणार नाही
By Admin | Updated: April 14, 2016 00:52 IST2016-04-14T00:52:35+5:302016-04-14T00:52:35+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यात २२ हातपंप बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी

पाणीटंचाई निर्माण होऊ देणार नाही
नाना पटोले : धरणाचे पाणी सोडण्याचे निर्देश
लाखांदूर : उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यात २२ हातपंप बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे. गोसे धरण व इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून दोन दिवसात पाणी मिळणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले.
तालुक्याला गोसे धरण तसेच इटियाडोह धरणाचे पाणी मिळते. दिवसेंदिवस चौरास भागात पाण्याची पातळी खोलीवर जात आहे. विहिरी कोरड्या, बोअर सुद्धा काम करेनासे झाले.
उन्हाळी धान पिकाला पाणी न मिळाल्याने करपू लागले. यातच जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कुपनलिका, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने या सर्व योजना बंद पडल्या. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीपैकी केवळ ५७ ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे हातपंप देखभाल दुरुस्ती करारनामा केला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६३ ग्रामपंचायतींनी विविध विकास कामे प्रस्तावित केली असली तरी ५० लक्ष रुपयाचा बृहद आराखडा तयार करण्यात आल्याचे आढावा बैठकीत माहिती देण्यात आली.
तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता आज खासदार नाना पटोले यांनी लाखांदूरला भेट दिली असता शेकडो नागरिक व शेतकऱ्यांनी पाणी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा लगेच गोसे धरण व इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात लाखांदूर तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे म्हणून सूचना केल्या. त्यामुळे दि. १५ एप्रिलपर्यंत पाणी पोहचेल म्हणून अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. लाखांदूर तालुक्याला पाणी मिळाल्यास पाण्याची पातळी नक्कीच वाढेल व पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. खा.नाना पटोले यांच्या प्रयत्नाने पाणी मिळणार असल्याचे नागरिक व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (तालुका प्रतिनिधी)