न्यु इंडिया इंशुरन्सला ३४ हजारांचा दंड
By Admin | Updated: August 1, 2014 00:08 IST2014-08-01T00:08:54+5:302014-08-01T00:08:54+5:30
मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली.

न्यु इंडिया इंशुरन्सला ३४ हजारांचा दंड
ग्राहक मंचचा निर्णय : बँक व्यवस्थापकालाही ठोठावला दंड
भंडारा : मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली. तर बँक आॅफ इंडियाने धनादेश अनादर झाल्याची बाब पुढे केल्याने या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सर्व पुरावे तपासल्यानंतर विमा कंपनी तथा बँकेला नुकसान भरपाई म्हणून दंड सुनावला आहे. ग्राहक मंचने दिलेल्या या निर्णयाने विमा कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे.
वरठी येथील सनफ्लॅग वसाहतीत राहणारे कृपाशंकर उर्फ शालीकराम पांडे यांनी मे. आॅटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि. नागपूर येथून २०१० मध्ये एम.एच. ३६ एच १०७४ क्रमांकाची नवीन अल्टो कार विकत घेतली होती. या गाडीचा त्यांनी न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी नागपूर विमा केला होता.
विम्याच्या रकमेसाठी त्यांनी बँक आॅफ इंडिया वरठी शाखेचा १९५९१ क्रमांकाचा ६ हजार ३९६ रुपयाचा धनादेश विमा कंपनीला दिला होता. २ फरवरी २०१२ ला सदर गाडीला धडक दिल्याने तिचे नुकसान झाले होते. त्यानंतर ती गाडी शोरूमला जमा करून तिचे नुकसानभरपाईचा दावा व गाडीचे नुकसान दुरुस्ती करण्यात आली. यासाठी कंपनीने वेळकाढूपणा करत पांडे यांना गाडी वेळेत दिली नाही. याबाबत त्यांनी कंपनीला विचारणा केली असता त्यांनी इंशुरन्स कंपनीला दिलेला धनादेश अनादर झाल्याने गाडीचा विमा नसल्याची माहिती दिली. यावरून पांडे यांनी बँक व इंशुरंस कंपनीकडे विचारणा करून बँकेत पैसे असल्याचे पुरावे सादर केले.
मात्र बँक आॅफ इंडियाचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी पांडे यांच्या खात्यातून रक्कम वटविण्याऐवजी त्यांनी चुकीच्या व्यक्तीच्या खात्यातील रक्कम वळविली. चुकीचा खाता क्रमांक टाकल्याने इंशुरन्स कंपनीकडे पाठविला धनादेश वटला नाही. याचा फटका पांडे यांना बसला. दरम्यान पांडे यांना गाडीच्या नुकसानभरपाईसाठी कंपनीकडे ३४ हजार रुपये भरावे लागले त्रास सहन करावा लागला.
याबाबत त्यांनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे तक्रार दाखल केली. यात त्यांनी ६० हजार रुपयाची नुकसानभरपाई मिळावी असा दावा इंशूरन्स कंपनी व बँकेविरुद्ध केला. याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी प्रकरणाची सर्व कागदपत्रे व पुरावे तपासली. त्यानंतर यात न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी व बँक आॅफ इंडिया दोषी असल्याचा ठपका ठेवला. तक्रारकर्ते पांडे यांना अपघातविम्याचे ३४ हजार रुपये हे ७ टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून देण्याचा आदेश दिला. बँकेला पांडे यांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी १० हजार रुपये व खर्चापोटी ५ हजार रुपये ३० दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिला. यावेळी मंचच्या सदस्या गीता बडवाईक, हेमंतकुमार पटेरिया यांनी यात महत्वाची भूमिका वटविली. तक्रारकर्ते पांडे यांच्याकडून अॅड.यु.बी. तिडके यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)