वैनगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘नीरी’चा पुढाकार

By Admin | Updated: June 14, 2016 00:18 IST2016-06-14T00:18:14+5:302016-06-14T00:18:14+5:30

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

'Neeri' initiative for the release of Vainganga pollution | वैनगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘नीरी’चा पुढाकार

वैनगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘नीरी’चा पुढाकार

स्वयंसेवी संस्थेला मिळाले पत्र : नगरपालिकेला प्रस्तावाची सूचना
भंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने (नीरी) पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या आशयाचे पत्र ग्रीन हेरीटेज बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्थेला प्राप्त झाले आहे. यात भंडारा नगर पालिका प्रशासनाला सुचित करून नदीच्या प्रदुषणाबाबत ‘नीरी’च्या माध्यमातून सर्व्हे करण्याची तयारी दर्शविली आहे.
नागनदीचे घाण पाणी आणि जलपर्णी वनस्पती (ईकॉर्निया) यामुळे वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातून ही वनस्पती काढण्याचे काम प्रशासनाकडून अधुनमधून केले जाते. परंतु पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत ठोस उपयायोजना अद्यापही झालेली नासल्याने भंडारेकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु असून नागपुरातून येणाऱ्या नागनदीचे केमिकलयुक्त घाण पाणी वैनगंगा नदीत मिसळत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. विद्यमान स्थितीत भंडारेकरांना दूषित पाण्यामुळे विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत या समस्येवर रामबाण उपायांवर काम होणे अगत्याचे झाले आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषदद्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो.
एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी बऱ्याच दिवसांपासून वैनगंगेचे पाणी पिणे बंद केले आहे. श्रीमंतांच्या घरी ‘आरो’ची सुविधा असली तरी गरिबांनी दूषित पाणी पिऊन आजार ओढून घ्यायचा काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
यासंदर्भात ग्रीन हेरिटेजचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी याबाबत ‘नीरी’शी पत्रव्यवहार सुरू केला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जाऊ न देता ते पाणी शुद्ध करण्याची गरज आहे.
याबाबत नीरी संस्थेनेही पुढाकार घेण्याबाबत संमती दिल्याचे समजते. आता गरज आहे ती भंडारा नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराची. (प्रतिनिधी)

Web Title: 'Neeri' initiative for the release of Vainganga pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.