मुलींना उच्चशिक्षण देणे काळाची गरज

By Admin | Updated: February 27, 2017 00:32 IST2017-02-27T00:32:07+5:302017-02-27T00:32:07+5:30

मुलगा व मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न ठेवता आईवडिलांनी मुलांप्रमाणेच मुलींनासुद्धा उच्चशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे, ...

The need of the hour to give higher education to girls | मुलींना उच्चशिक्षण देणे काळाची गरज

मुलींना उच्चशिक्षण देणे काळाची गरज

मेश्राम यांचे प्रतिपादन : विनोद विद्यालयात बेटी बचाओ संकल्प उत्सव
भंडारा : मुलगा व मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न ठेवता आईवडिलांनी मुलांप्रमाणेच मुलींनासुद्धा उच्चशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक कार्तिक स्वामी मेश्राम यांनी केले. विनोद विद्यालय सिल्ली येथे आयोजित तालुकास्तरीय बेटी बचाओ संकल्प उत्सवात ते बोलत होते.
शिक्षण विभाग पंचायत समिती भंडाराच्या मीना राजू मंच अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्प उत्सव विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली (आंबाडी) येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रा.अनमोल देशपांडे होते. अतिथी म्हणून कार्तीक स्वामी मेश्राम, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, विद्यालयाचे उपप्राचार्य शत्रूघ्न भांडारकर, समुपदेशक सरिता रहांगडाले, सिल्लीच्या समाजसेविका देवांगणा माकडे, ज्योती नाकतोडे, पोलीस विभागाचे कराडे, प्राथमिक आरोग्य केंद्र कारधाच्या डॉ.बोंदरे, उपकेंद्राच्या झलके, विस्तार अधिकारी टेंभूरकर, मीना राजू मंचच्या प्रमुख एच.बी. सरादे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून शंकर राठोड यांनी केले. त्यांनी शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश संकल्प उत्सवाच्या निमित्ताने घराघरात पोहचावा, या दृष्टीकोणातून इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींना व त्यांच्या पालकांना या संकल्प उत्सवात बोलाविण्यात आले आहे. या माध्यमातून मुलामुलींतील असलेली विषमतेची भावना नष्ट होऊन त्यात समानतेचा दृष्टीकोण समाजात रूजविण्यासाठी या कार्यक्रमाचा एकमात्र उपदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्तीकस्वामी यांनी आपले स्वत:चे उदाहरण सादर करून सांगितले की, माझ्याकडे चार मुली असून मी मोठ्या मुलीला इंजिनियर बनविले व आता ती स्वत:च्या पायावर उभी आहे. त्याप्रमाणेच इतर मुलींनासुद्धा चांगले शिकवून त्यांनी सुद्धा स्वत:च्या पायावर उभे करून स्वाभीमानाने जीवन जगण्यात उदयुक्त करणार. मी मुलांप्रमाणेच माझ्या सर्व मुलींना शिक्षण देत आहे. ही प्रेरणा घेऊन सर्व पालकांनी सुद्धा मुलीला बोझा न समजता मुलगा समजून उच्च शिक्षण दिले पाहिजे, असे सांगितले.
समाजसेविका देवांगणा माकडे यांनी त्यांना मुली नसल्याची खंत व्यक्त करून सांगितले की, त्यांना एकतरी मुलगी परमेश्वराने दिली असती तर मी धन्य झालो असतो. कारण मुलांपेक्षा मुलींना आईवडीलांची दया जास्त येत असते. मुलगा वंशाचा दिवा असतो. तर मुलगी प्रकाश देणारी पणती आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
समुपदेशिका सरिता राहांगडाले यांनी मुलींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मुलगी ही मुलांपेक्षाही जास्त प्रभावशाली व भाऊक असते. मुलगा एकाच घराचे नावलौकीक करीत असतो. तर मुलगी माहेरी व सासरी या दोन्ही घरी नावलौकीक करून सेवा देत असते. त्यामुळेच मुलापेक्षाही मुलींना अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. त्या म्हणाल्या, समाजात भ्रृणहत्या यांचे प्रमाण मागील काळात वाढल्याने मुलींची संघटना कमी कमी होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे राहांगडाले यांनी सांगितले.
पोलीस विभागाचे कराडे यांनी मुलींच्या संरक्षणावर कायद्यातील तरतुदी सांगून मुलींना टोल फ्री क्रमांक सांगितला. तसेच यापुढे कोणतेही मुलगी पोलिसांकडे जाणार नाही तर पोलीसच आपले संरक्षणासाठी आपल्यापर्यंत येणार असल्याचे सांगितले.
यानंतर ज्योती नाकतोडे, आरोग्य केंद्राच्या डॉ.बोंदरे, झलके यांनी सुद्धा मुलींनी घ्यावयाची काळजी वैयक्तिक स्वच्छता, स्वत:चे संरक्षण, भूलथापा किंवा प्रशंसा यापासून बचाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाअंतर्गत विनोद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रृणहत्या, मुलींचा छळ यावर आधारित एक नृत्य सादर केले. तसेच गांधी विद्यालय पहेलाच्या विद्यार्थिनींनी स्त्री भ्रृणहत्येवर आधारित नाटीका सादर करून सर्वांनाच भारावून टाकले. या भ्रूणहत्या नाटीकेतून मुलींबद्दलची दयेची भावना जागृत होताना दिसून आले. कारण नाटीका संपताच सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू पाझरलेले होते.
शत्रूघ्न भांडारकर यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या संकल्प उत्सवाची गरज फक्त आठव्या वर्गातील मुलींना किंवा पालकांपुरतीच मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी या कार्यक्रमाची गरज आहे. अशाप्रकारचे संकल्प उत्सव कार्यक्रम गावांगावातून जनजागरण करण्यासाठी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रा.अनमोल देशपांडे म्हणाले, मुलांपेक्षाही मुली जास्त भावूक, संयमी, प्रभावशाली, दयाळू असतात. त्यामुळे मुलांप्रमाणेच मुलींनीही चांगले शिक्षण दिले गेले पाहिजे. ते म्हणाले, मी माझ्या मुलापेक्षा माझ्या मुलीला जास्त महत्व देतो. माझी मुलगी मला जास्त आवडते. त्यामुळे मी माझ्या मुलापेक्षाही मी तिच्या सर्व गरजा प्राधान्याने पूर्ण करीत असतो. कारण तिला माझ्याबद्दल मुलाच्या तुलनेत जास्त आदर व प्रेम आहे. त्यामुळे आपण सर्वांच्या मुलींच्या शिक्षणाचे त्यांच्या गरजांकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यानंतर मीना, राजू मंचच्या प्रमुख सरादे यांनी आपल्या आभार प्रदर्शनपर मार्गदर्शनातून कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी मस्के यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद यांची लक्षणीय उपस्थिती होती. शेवटी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The need of the hour to give higher education to girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.