निसर्गाची वक्रदृष्टी कायम
By Admin | Updated: July 12, 2014 23:30 IST2014-07-12T23:30:53+5:302014-07-12T23:30:53+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतकरी संकटाच्या भीतीने हतबल झाल्याचे दिसत आहे.

निसर्गाची वक्रदृष्टी कायम
साकोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतकरी संकटाच्या भीतीने हतबल झाल्याचे दिसत आहे. सततच्या नापीकीमुळे शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
मागीलवर्षीच्या खरीप हंगामात जून महिना सुरू होताच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या अतिवृष्टीमुळे मागीलवर्षी धान, तुर, सोयाबिन तसेच खरीप हंगामातील इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर रब्बी हांगामातही संततधार पावसाने व गारपिटीने पिकाचे होत्याचे नव्हते केले.
मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळातून शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षीच्या खरीप हंगामात त्याची भरपाई मिळेल या हेतुने शेतकऱ्यांनी उन्हातान्हात राबराब राबून शेतीची मशागत केल्यानंतर बँकेतून कर्ज काढून तर काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामाची कशीबशी धानभरणी केली.
पावसाने अजूनपर्यंत हजेरी न लावल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. उष्णतेच्या तडाख्यात हिरवेगार दिसरणारे शेतशिवार आता ओसाड दिसू लागले आहेत. अशा संकटाच्या मालिकेने शेतकरी पुस्ता हादरून गेला आहे. शेतकऱ्यांनी आता पाऊस येईल या आशेने पेरणी उरकून घेतली. परंतु पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या दिसत आहेत.
उन्हाचा तडाखा पावसाची पाठ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडलेला दिसत आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)