नेपीयर गवत ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:44+5:302021-07-08T04:23:44+5:30
भंडारा : शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी नेपीयर गवतापासून जैविक इंधन तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. भंडारा तालुक्यात नेपीयर ...

नेपीयर गवत ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
भंडारा : शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी नेपीयर गवतापासून जैविक इंधन तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. भंडारा तालुक्यात नेपीयर गवतापासून तयार होणारा जैविक इंधन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. यासंदर्भात चार उमद्या तरुणांनी प्राधान्य देत याकडे वाटचालही सुरू केली आहे.
भंडारा येथील अमित खैरकर, संजय पराते, प्रशांत चरडे व संजय कुंभलकर यांनी हा प्रकल्प शेतकरी हिताला प्राधान्य देत उभारण्याचे काम केले आहे. हा प्रकल्प महाशिवबा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व मीरा क्लीनफ्ल्युएल लिमिटेड (मुंबई) या कंपनीच्या तांत्रिक व आर्थिक मदतीच्या सहाय्याने उभारण्यात आला आहे. भंडारा तालुक्यात नेपीयर ग्रास या गवतावर प्रक्रिया करून जैविक इंधन सीएनजी, पीएनजी व सीओटू सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. या कंपनीच्या अंतर्गत शेतकरी सभासदांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नेपीयर ग्रास या गवताची लागवड करायला प्रोत्साहित करून त्या गवताची खरेदी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे जैविक इंधन हा सर्वात उत्तम पर्याय ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन ते पाच हजार युवकांना रोजगार देण्याचा मानसही या उमद्या तरुणांनी व्यक्त केला आहे.
बॉक्स
बियाण्याची मोफत व्यवस्था
शेतकऱ्यांना नेपीयर ग्रासची लागवड करण्याकरिता कंपनीच्या माध्यमातून बियाण्याची मोफत व्यवस्था करून देण्यासोबतच तांत्रिक माहिती व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. हे गवत प्रतिटन एक हजार रुपयेप्रमाणे कंपनी खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हाच प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे.
कोट बॉक्स
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासोबतच त्यांना तांत्रिक बाबींचे ज्ञान देऊन आर्थिक उन्नती कशी साधता येईल, याकडे आमचा प्रयत्न आहे. याशिवाय देशात वाढती इंधनाची दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अमित खैरकर, भंडारा.