संमतीपत्राविना वगळली वारसानदारांची नावे
By Admin | Updated: June 18, 2014 00:03 IST2014-06-18T00:03:11+5:302014-06-18T00:03:11+5:30
मोहाडी तालुक्यातील मौजा काटेबाम्हणी प.ह.नं. १०, खाते क्रमांक ५२ मधील भूमापन क्र. २४५/४ व भूमापन क्रमांक २४६/४ मधील एकूण १.०८ हे.आर. वडीलोपार्जीत दोन्ही शेतजमिनीवरील सातबारा

संमतीपत्राविना वगळली वारसानदारांची नावे
चौकशीची मागणी : काटेबाम्हणी व सालई येथील प्रकार
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मौजा काटेबाम्हणी प.ह.नं. १०, खाते क्रमांक ५२ मधील भूमापन क्र. २४५/४ व भूमापन क्रमांक २४६/४ मधील एकूण १.०८ हे.आर. वडीलोपार्जीत दोन्ही शेतजमिनीवरील सातबारा उताऱ्यावर सालई (बु.) येथील एकूण सहा व्यक्तींची नावे होती. मात्र वारसदार असलेल्या भावांनी ३ बहिणींना विश्वासात न घेता संमतीपत्र न घेता त्यांची नावे सातबारा उताऱ्यावरून फेरफार करून वगळली. अजान मुलाचे नावे विक्रीपत्र सुद्धा करून घेतले. महसूल प्रशासनाने सुद्धा गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष केले असून चौकशीची व न्यायाची मागणी अन्यायग्रस्त वारसदार बहिणींनी केली आहे.
मोहाडी तालुक्यातील मौजा काटेबाम्हणी प.ह.नं. १०, खाते क्रमांक ५२ (वर्ग २) भूमापन क्रमांक २४५/४ (०.७८ हे.आर.) व भूमापन क्रमांक २४६/४ (०.३८ हे.आर.) अशी एकूण १.०८ हे.आर. वडिलोपार्जीत शेतजमिनीवरील सातबारा उताऱ्यावर सालई (बु.) येथील गौरीशंकर नारायण तुमसरे, सरस्वता बे.नारायण तुमसरे, रामचंद्र नारायण तुमसरे, निर्मला देवराम बुराडे, अल्का सूर्यभान चौधरी, कल्पना ज्ञानेश्वर ढेंगे आदी वारसांनाची नावे होती. उपरोक्त सर्व वारसान स्वर्गीय नारायण तुमसरे यांची आहेत. त्यामध्ये पत्नी सरस्वता, मुले गौरीशंकर व रामचंद्र, मुली निर्मला, अल्का व कल्पना यांचा समावेश आहे. तिन्ही मुलींचे लग्न झाले असून त्या अनुक्रमे मुंढरी (खुर्द), ता.मोहाडी, खैरी (ता.तिरोडा), करडी (ता.मोहाडी) येथे सासरी राहतात. नावे कमी करताना तिन्ही वारसांना कोणतेही नोटीस गेले नाही. सदर जमीन मोहाडी तहसीलदार यांचे दि. ८ फेब्रुवारी २०१४ चे आदेशाप्रमाणे फेरफार घेऊन उपरोक्त तिन्ही मुलींचे नावे सातबारा उताऱ्यावरून कमी केली गेली व दोन्ही शेतीच्या गटावर रामचंद्र तुमसरे आणि त्यांचा मुलगा रोहित तुमसरे (५) यांची नावे चढविण्यात आली.
रामचंद्र तुमसरे यांनी सातबारा उताऱ्यावरून बहिणींची नावे कमी करताना त्यांना विश्वासात घेतले नाही. त्यांचेकडून संमतीपत्र सुद्धा लिहून घेतले नाही. महसूल प्रशासनाने सुद्धा वारसदार तिन्ही बहिणींचे संमतीपत्र नसताना सुद्धा नावे कमी करून फेरफार घेण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर प्रकरणी राजकीय दबाव वापरला असावा अशी शंका वारसदार बहिणींकडून व्यक्त होत आहे. अर्थपूर्ण व्यवहाराची शंकर व्यक्त केली जात आहे. यावरही समाधान न झालेल्या भावाने अल्पवयीन रोहितचे नावे जमिनीची विक्रीपत्र करवून घेतले. त्यात पालकत्व म्हणून रोहितची आई शालू रामचंद्र तुमसरे यांचे नाव लिहिले गेले. त्या सालई (बु.) येथील ग्रामपंचायत सदस्या आहेत. महसूल कर्मचारी यांच्या संगनमताने गैरप्रकार करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विश्वासात न घेता, संमतीपत्त न घेता सातबारा वरून बहिणींचे नाव अवैधरित्या वगळल्या प्रकरणी अन्यायग्रस्त बहिणींनी न्यायासाठी जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, विभागीय महसूल आयुक्त, तहसीलदार मोहाडी यांना तक्रारीचे निवेदन दिले आहणे. प्रकरणी काय निर्णय दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(वार्ताहर)