जिल्ह्यात ४८ ठिकाणी नमाज पठन

By Admin | Updated: July 19, 2015 00:47 IST2015-07-19T00:47:48+5:302015-07-19T00:47:48+5:30

जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी आज, शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी केली. जिल्ह्यातील ४८ ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी ...

Namaz read in 48 places in the district | जिल्ह्यात ४८ ठिकाणी नमाज पठन

जिल्ह्यात ४८ ठिकाणी नमाज पठन

रमजान ईद उत्साहात : देशात शांती नांदावी यासाठी साकडे
भंडारा : जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी आज, शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी केली. जिल्ह्यातील ४८ ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक मशिदीत त्यांनी अल्लाकडे नमाज अदा केला आणि सुखशांतीसाठी दुआ केली.
नमाज अदा केल्यानंतर मौलवींनी देशात शांती नांदावी, अशी दुआ मागितली. पवनी पोलीस ठाणे अंतर्गत ५ ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. याप्रमाणे अड्याळ ५, जवाहरनगर २, भंडारा ९, कारधा ३, मोहाडी ४, आंधळगाव ४, सिहोरा १, साकोली ३, लाखनी ३, पालांदूर १, लाखांदूर ४, दिघोरी १, तुमसर २, गोबरवाहीत ६ ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. भंडारा शहरात मुस्लीम लायब्ररी चौक, टप्पा मोहल्ला, शितला माता मंदिर परिसर, मेंढा परिसर, पोस्ट आॅफिस चौक आदी परिसरात मुस्लिमबहुल वस्ती आहे. शहरात ४ ठिकाणी मोठ्या संख्येने नमाज पठण करण्यात आले.
मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत प्रत्येकाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. मोबाईलद्वारे एसएमएस शुभेच्छाही देण्यात आल्या. घरोघरी कौटुंबिक सदस्यांसह शीरकुर्म्याचा आस्वाद घेण्यात आला. बच्चे कंपनीतही ईदचा उत्साह होता. त्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत गोडधोड पदार्थांवर ताव मारला. मुस्लिम मोहल्यात फलाहार, फिरनी, शिरा, मालपुआ, खजूर, रबडी, मिठाई आदी पदार्थांची रेलचेल होती. प्रत्येक जण नवा पेहराव करून उत्साहात सहभागी झाला होता.
रमजान ईदला मुस्लिम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज सकाळपासूनच शहरातील मुस्लिम बहुल भागात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले. शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात येत असल्याने शहरात सर्वधर्म समभाव दिसल्याचे दिसून आले. अनेकांनी पावसासाठी अल्लाकडे साकडे घातले. (नगर प्रतिनिधी)

दुधाला प्रचंड मागणी
रमजान ईदनिमित्त शीरकुर्म्यासाठी दूध मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. समाजाच्या काही बांधवांनी गरिबांसाठी कमी दरात दुधाची विक्री केली. आज दुधाला प्रचंड मागणी होती.
ग्रामीण भागातही उत्साह
शहरी भागासह ग्रामीण भागातही रमजान ईदचा उत्साह दिसून आला़ सर्वधर्मियांनी ईदमध्ये सहभागी होऊन मुस्लिम धर्मियांना शुभेच्छा दिल्या़ सर्वत्र शांततेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली़

Web Title: Namaz read in 48 places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.