MPs hit sand dune in Pawani | पवनीतील रेती घाटावर धडकले खासदार
पवनीतील रेती घाटावर धडकले खासदार

ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : विभागीय आयुक्तांना दिली माहिती, कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवैध रेती उत्खनन होत असलेल्या रेती घाटावर खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता अचानक भेट दिली असता अवैध रेतीचे ऊत्खनन सुरू दिसले. मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन असल्याने खा. सुनील मेंढे यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना कल्पना दिली. या अवैध उत्खनना विरोधात कारवाईची करण्याची मागणी देखील केली.
अवैध रेती उत्खनन विरोधात उपोषणाला बसलेल्या वलनीचे सरंपच दिपक तिघरे व त्यांचे सहकारी यांच्याशी खासदार मेंढे यांनी उपोषण ठिकाणी भेटून या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर खा. मेंढे यांनी पवनीचे तहसिलदार यांच्याकडे जाऊन यासंबंधी विचारणा देखील केली.
दरम्यान, तहसिलदारांनी सांगितलेल्या प्रशासकीय परवानगीसंबंधी माहितीमध्ये तफावत आढळल्याने खा. मेंढेनी येनोळाच्या उपस्याचे परवानगी आदेश दाखवा, असे सांगताच तहसीलदारांची भंबेरी उडाली. चुकीची माहिती मिळत असल्याने तेथूनच खासदार सुनील मेंढे यांच्या आदेशाने तहसीलदार पवनीची चमू, पोलिस विभाग, पत्रकार, कार्यकर्ते व गावकरी घेऊन रेतीघाटाकडे निघाले. भोजापुरात दोन घाटावर ४० ब्रास रेतीसाठा व दोन किमी नदीपात्रात उत्खनन दिसून आले. खातखेडा घाटात ५०० व ३५० ब्रास रेतीसाठा दोन किमी नदीपात्रात १५ फुटाचे किमान ३५ ठिकाणाहून उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. यासंबंधी अधिक माहिती देताना खासदार मेंढे म्हणाले, वाघधरा (पवनी) घाटावर दोन किमी अंतर ऊत्खनन झाल्याचे आढळून आले आहे. तसेच येनोळा येथे कायदेशीर घाट सांगून तीन महिन्यांपासून भरदिवसा एक हजार ब्रास उपसा सुरू आहे. तिथे पाच हजार ब्रास रेतीसाठा आहे. अशाप्रकारे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू असल्याने सर्व नदी पात्राची ड्रोणद्वारे शुुटिंग करण्याचे निर्देश दिले. पवनीत २४ घाटावर एकूण अवैधरित्या रेती उत्खनन सुरू आहे. अवैध उत्खनन तातडीने थांबविण्याची मागणी विभागीय आयुक्तांना केली असल्याची माहिती खासदारांनी दिली.
यावेळी राजेंद्र फुलबांधे, मोहन सुरकर, हरीश तलमले, अनील मेंढे, मनोहर आकरे, विलास कुर्झेकर, दत्तु मुनरतीवार, मच्छिंद्र हटवार, दिंगाबर वंजारी, मयुर रेवतकर, सचिन शहारे व शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान, वैनगंगा नदीला विद्रुप करणाऱ्या रेती माफिया, महसूल अधिकारी यांच्यावर आवर घाला, अशी मागणी होत आहे.

Web Title: MPs hit sand dune in Pawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.