खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 11, 2025 17:55 IST2025-09-11T17:54:28+5:302025-09-11T17:55:53+5:30
Nagpur : नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ ट्रकची कारला धडक

MP Prashant Padole narrowly escapes accident; Issue of government not providing security in Naxal-affected areas under discussion
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला गुरूवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ एका ट्रकची त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) कारला धडक बसली. यात, खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेच्या वेळी वाहनात खासदार स्वतः उपस्थित होते. दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करून ते विमानाने मुंबईला पाेहचले. तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे परतत होते. तेव्हा नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली. डॉ. पडोळे यांच्यासह सर्व सहकारी सुखरूप आहेत.
अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. वाहन रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले, पुढील चौकशी सुरू आहे. खासदार डॉ. पडोळे यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना तातडीने उपचार देण्यात आले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बराचसा भाग नक्षलप्रभावित आहे. अशा परिस्थितीत खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.